नागपुरात वीज यंत्रणा कोलमडली, बहुतांश भागात रात्रभर बत्ती गुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2022 11:07 AM2022-05-13T11:07:38+5:302022-05-13T11:18:05+5:30

शहरातील वीज वितरण व्यवस्था प्रभावित झाली असल्याची कबुली महावितरणने दिली आहे.

power outage due to technical failure in wathoda area overnight in nagpur | नागपुरात वीज यंत्रणा कोलमडली, बहुतांश भागात रात्रभर बत्ती गुल

नागपुरात वीज यंत्रणा कोलमडली, बहुतांश भागात रात्रभर बत्ती गुल

Next
ठळक मुद्देबोर्ड परीक्षार्थी त्रस्त : दक्षिण, पूर्व, मध्य नागपुरात अंधारमहावितरण फेल : ट्रान्सफार्मरअभावी वाठोड्यातील संकट कायम

नागपूर : अखंडित वीज पुरवठ्यासाठी सज्ज असल्याच्या दावा करणारी महावितरण यंत्रणा ऐन् उन्हाळ्यात फेल ठरली आहे. दिवसभरात कधीही वीजपुरवठा खंडित होत आहे. मंगळवारच्या पाठोपाठ बुधवारी रात्रीही शहरातील बहुतांश भागातील बत्ती गुल झाली. नागरिकांना भीषण गर्मीत रात्र अंधारात काढावी लागली. बोर्डाच्या परीक्षेची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांनाही याचा त्रास सहन करावा लागला.

मंगळवारी रात्री महापारेषणच्या खापरखेडा उपकेंद्रावरील भार वाढल्यामुळे खापरखेडा- कन्हान लाईन ट्रीप झाली. परिणामी दक्षिण, पूर्व व मध्य नागपूरसह भंडारा जिल्ह्यापर्यंतचा वीजपुरवठा खंडित झाला. बुधवारी रात्री देखील तांत्रिक बिघाडामुळे अशीच परिस्थिती निर्माण झाली. निर्मल नगरी उपकेंद्रातील ३३ केव्ही क्षमतेचा केबल खराब झाला. सुमारे पाच किलोमीटर लांबीचा हा केबल जमिनीत सुमारे १० फूट खाली टाकण्यात आला आहे. दरम्यान, वाठोडा उपकेंद्रातील १० एमव्हीए क्षमतेचे पॉवर ट्रान्सफॉर्मर रात्री ११.३६ वाजता फेल झाले.

यासोबतच वाठोड़ा, हिवरी नगर, अनमोल नगर आदी भागात अंधार पसरला. महावितरणने रात्री उशीरा उमरेड मार्गावरील सिमेंट रोड खोदून दुरुस्तीच्या कामास सुरुवात केली. रात्रभर काम केल्यामुळे सकाळी ९ वाजता वीजपुरवठा सुरू झाला. मानेवाडा, सोमवारी क्वार्टर आदी भागातही वीज नव्हती. उत्तर नागपूरच्या बहुतांश भागांसह मोमिनपुरा, टिमकी आदी भागातही विजेचा लपंडाव सुरू होता. महालमध्ये गुरुवारी रात्री ७ च्या सुमारास वीज गेली. आता उद्या, शुक्रवारी सकाळी ८ वाजता वीज येईल, असे मेसेज नागरिकांना मोबाईलवर आले.

मागणी ५५० मेगावॅटने वाढली 

शहरातील वीज वितरण व्यवस्था प्रभावित झाली असल्याची कबुली महावितरणने दिली आहे. उन्हामुळे एसी, कुलरचा वापर वाढला आहे. परिणामी १०० मेगावॅटची मागणी ५५० ने वाढून ६५० मेगावॅट वर पोहचली आहे. ही परिस्थिती पाहता नागरिकांनी संयम बाळगण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

आमगाव येथून आणणार पॉवर ट्रान्सफार्मर

वाठोडा परिसरातील वीज संकट कायम आहे. नागपुरात पॉवर ट्रान्सफार्मर उपलब्ध नाही. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील आमगाव येथून आणण्यात येणार आहे. शुक्रवारी ते नागपुरात पोहचेल. नवा ट्रान्सफार्मर लागल्यावर परिस्थिती नियंत्रणात येईल. नागपूरसारख्या उप राजधानीच्या शहरात आकस्मिक परिस्थितीचा सामना करण्यासाठी एकही ट्रान्सफार्मर उपलब्ध नसल्यामुळे महावितरणच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह लागले आहे.

Web Title: power outage due to technical failure in wathoda area overnight in nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.