विजेचा लपंडाव सुरू, मेंटेनन्सचाही फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:07 AM2021-05-27T04:07:30+5:302021-05-27T04:07:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : बुद्ध पौर्णिमेनिमित्त बुधवारी सुटी होती. कोरोना संसर्गामुळे बुद्ध पौर्णिमा घरीच साजरी करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बुद्ध पौर्णिमेनिमित्त बुधवारी सुटी होती. कोरोना संसर्गामुळे बुद्ध पौर्णिमा घरीच साजरी करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले होते. परंतु महावितरणने नागरिकांच्या उत्साहावरच पाणी फेरले. मेंटेनन्सच्या नावावर शहरातील बहुतांश भागातील वीज अनेक तास गायब होती. ही केवळ आजचीच गोष्ट नाही. विजेचा लपंडाव ही रोजचीच बाब झाली आहे. उन्हाळ्याच्या या दिवसात दररोज तांत्रिक कारणांचा हवाला देत अनेक भागातील वीज बंद राहते. त्यामुळे आता महावितरण दर बुधवारी मेंटेनन्सच्या नावावर वीज बंद ठेवून नेमके करते तरी काय? असा प्रश्न निर्माण झााला आहे.
मोमीनपुरा येथील कब्रस्तान रोडवर बुधवारी सकाळी ११ वाजता वीज गेली. १.३० वाजताच्या सुमारास वीज आली. परंतु पुन्हा वीज गेली. सायंकाळपर्यंत विजेचा लपंडाव सुरूच होता. वाठोड्यातील श्रीकृष्णनगर येथेही मंगळवारी रात्री अचानक वीज गेली. रविवारी जयहिंद व चिंचभुवन सब-स्टेशनशी संबंधित भागात पांजरी फीडरमध्ये ब्रेकडाऊन झाल्याने अंधार पसरला. सोमवारी मानेवाडा सब-स्टेशनअंतर्गत असलेल्या शाहूनगर व मंगलदीपनगर फीडर ठप्प पडले. एम्प्रेस सिटी फीडरमध्येही तांत्रिक बिघाड आला. ज्या प्रमाणावर वीज पुरवठा बाधित होत आहे, त्यावरून मेंटेनन्सच्या कामात निष्काळजीपणा केला जात असल्याचे दिसून येते.
परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, विजेची ये-जा ही सामान्य बाब झाली आहे. थोडाही पाऊस पडला तरी वीज पुरवठा खंडित होतो. हा सर्व प्रकार तेव्हा सुरू आहे जेव्हा महावितरण दर बुधवारी देखभाल-दुरुस्ती करीत असल्याचा दावा करतो. बुधवारीसुद्धा हिवरीनगर, इतवारी, बिनाकी आदी परिसरातील काही भागात वीज नव्हती. याची घोषणा अगोदरच करण्यात आली होती. परंतु जानकीनगर फीडरमध्येही आपात्कालीन मेंटेनन्स करावे लागले. भगवाननगर परिसरातही झाडांच्या फांद्या कापण्याच्या नावावर वीज बंद होती.
बॉक्स
मान्सूनसाठी होत आहे तयारी
महावितरणचे अधीक्षक अभियंता अमित परांजपे यांनी सांगितले की, मागच्या आठवड्यात हवामान बदलल्याने समस्या निर्माण झाली होती. परंतु आता परिस्थिती नियंत्रणात आहे. आगामी मान्सूनचा विचार करता मेंटेनन्स सुरू आहे. मान्सूनमध्ये कुठेही अडचण येऊ नये, त्यादृष्टीने कामे सुरू आहेत.