गणेशनगरीतील पाणीपुरवठा याेजनेचा वीजपुरवठा खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:09 AM2021-03-23T04:09:48+5:302021-03-23T04:09:48+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क काेराडी : बाेखारा ग्रामपंचायतअंतर्गत असलेल्या गणेशनगरी वसाहतीला पाणीपुरवठा करणाऱ्या याेजनेचा वीजपुरवठा महावितरणने खंडित केला आहे. परिणामी ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
काेराडी : बाेखारा ग्रामपंचायतअंतर्गत असलेल्या गणेशनगरी वसाहतीला पाणीपुरवठा करणाऱ्या याेजनेचा वीजपुरवठा महावितरणने खंडित केला आहे. परिणामी याठिकाणी कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाल्याने वसाहतीतील नागरिक त्रस्त झाले आहेत. पाणीपुरवठा याेजनेचे वीजबिल भरण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीकडे असल्याने ग्रामपंचायतीने बिलाचा भरणा करण्याची मागणी नागरिकांनी रेटून धरली. मात्र ग्रामपंचायतीने आठ लाखांचे थकीत बिल भरण्यास हतबलता दाखविल्याने नागरिकांनी आता ऊर्जा तथा पालकमंत्री नितीन राऊत यांना साकडे घातले आहे.
गणेशनगरी या वसाहतीला बिल्डरच्या वतीने स्वतंत्र पाणीपुरवठा याेजना कार्यान्वित करण्यात आली. ग्रामपंचायतशी २००६ मध्ये झालेल्या करारानुसार या याेजनेचे वीजबिल भरण्याबाबत ग्रामपंचायतीने मान्य केले. तेव्हापासून ग्रामपंचायत पाणीपुरवठा याेजनेचे बिल भरत आहे. सध्या विद्युत बिलापाेटी आठ लाखांची थकबाकी असल्याने महावितरणने वीजपुरवठा खंडित केला. त्यामुळे वसाहतीत पाणी समस्या निर्माण झाली. नागरिकांनी सरपंच अनिता पंडित व ग्रामविकास अधिकारी निमजे यांच्याकडे बिलाचा भरणा करून पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी केली असता, निधी उपलब्ध नसल्याचे सांगून ग्रामपंचायतीने हतबलता दाखविली.
त्यामुळे या वसाहतीला पाणीपुरवठ्याचा प्रश्न निर्माण झाला. सरपंच अनिता बाबा पंडित व ग्रामविकास अधिकारी निमजे यांच्याकडे नागरिकांनी विजेचे बिल भरून पाणीपुरवठा सुरू करण्याची विनंती केली असता ग्रामपंचायतीकडे विजेचे बिल भरण्यासाठी निधीच उपलब्ध नसल्याने ग्रामपंचायतीने हतबलता दाखवली. दरम्यान, नागरिकांनी ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री नितीन राऊत यांना निवेदन देऊन पाणीपुरवठा याेजनेचा वीजपुरवठा पूर्ववत करण्याची मागणी केली आहे. निवेदन देताना रामदास बडवाईक, किशोर मेश्राम, एस. आर. दुधे, के. पी. राऊत शिशुपाल कनोजे, समीर ढोरे, राहुल भटकर, सतीशचंद्र जोशी, दिनेशकुमार सिंग, शंकर कुशवाह, पी. पी. मुंगसे, एस. बी. देशमुख, दिलीप धकाते आदी उपस्थित हाेते.
यासंदर्भात सरपंच अनिता पंडित यांच्याशी संपर्क साधला असता, काेराेनामुळे ग्रामपंचायत आर्थिक अडचणीत आहे. वीजबिल भरण्यासाठी निधी उपलब्ध नाही. अशा स्थितीत महावितरणने पूर्वसूचना न देता पाणीपुरवठा याेजनेचे वीज कनेक्शन कापले आहे. ऊर्जामंत्र्यांनी संबंधितांना आदेश देऊन वीजपुरवठा पूर्ववत करावा. गणेशनगरीसह बाेखारावासीयांना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने साकारलेली याेजना लवकर कार्यान्वित व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू आहे. यासाठी प्राथमिकता असल्याचे मत सरपंच अनिता पंडित यांनी व्यक्त केले.