दुर्बल महिलांना ‘मंच’ची शक्ती!
By admin | Published: September 23, 2015 06:44 AM2015-09-23T06:44:39+5:302015-09-23T06:44:39+5:30
दिवसेंदिवस समाजात महिलांवरील अन्याय-अत्याचाराच्या घटना वाढतच आहे. महिलेला या समाजाने नेहमीच दुर्बल
नागपूर : दिवसेंदिवस समाजात महिलांवरील अन्याय-अत्याचाराच्या घटना वाढतच आहे. महिलेला या समाजाने नेहमीच दुर्बल समजले आहे. मात्र महिला ही कधीच दुर्बल राहिलेली नाही. केवळ तिला लढण्यासाठी भक्कम पाठबळाची गरज लागली आहे. शिवाय स्वत:च्या पायावर उभे होण्यासाठी आर्थिक मदतीचा हात हवा आहे. समाजातील अशा गरजू व गरीब महिलांसाठीच ‘आई तुळजा भवानी महिला मंच’ तयार झाला आहे. दुर्बल महिलांना ‘मंच’ शक्ती देण्याचे काम करीत असल्याचा विश्वास मंचच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी ‘लोकमत व्यासपीठ’ च्या मंचावर व्यक्त केला.
मागील आठ वर्षांपूर्वी भिसीच्या माध्यमातून केवळ १५ महिलांनी एकत्रित येऊन हा मंच तयार केला. परंतु आज या मंचातील सभासद संख्या ९०० वर पोहोचली आहे.
या मंचमध्ये गृहिणींसह डॉक्टर व शिक्षिका अशा वेगवेगळ््या क्षेत्रातील महिलांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, अवघ्या आठ वर्षांत या महिला मंचचा वटवृक्ष तयार झाला आहे. या मंचच्या माध्यमातून गरजू व गरीब महिलांना आर्थिक मदत करता यावी, या हेतूने ‘आई तुळजा भवानी महिला नागरी सहकारी पतसंस्था’ स्थापन करण्यात आली आहे.
या माध्यमातून मागेल त्या गरजू व गरीब महिलांना ५० हजार रुपयांपर्यंत अत्यंत कमी व्याज दरात कर्ज उपलब्ध करू न दिले जात असल्याचे यावेळी मंचच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
सध्या या संस्थेचे १६ ते १७ लाख रुपये भागभांडवल असून त्यांच्याकडे ३० लाखांच्या ठेवी आहेत. यातून यंदा सुमारे २६ लाखांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. याचा गरीब महिलांना फार मोठा फायदा होत असून, आतापर्यंत ५० ते ६० गरीब महिलांनी संस्थेच्या कर्जावर ब्युटीपार्लर, गृह उद्योग, बुटीक सारखे स्वयंरोजगार सुरू केले आहेत.
विशेष म्हणजे, अनेक मोलकरीण महिलांना या संस्थेत सभासद करू न त्यांना वेळोवेळी आर्थिक मदत केली जात आहे. या चर्चेत डॉ. सुनेत्रा येवले, सोनम लाखे, माधुरी मुलनकर, सुनीता राऊत, लिना भोंडे, ज्योती तपाडकर, अर्चना लांडे, अर्चना बरडे व सुनीता कोट्टेवार यांनी भाग घेतला होता.(प्रतिनिधी)
शेतकऱ्यांना मदत
आज विदर्भातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. यातून अनेकजण आत्महत्या करीत आहे. महिला मंचने अशा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी मंचतील प्रत्येक सभासद वर्गणी करू न एक मोठा निधी गोळा करणार असल्याचा मानस यावेळी मंचाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. यानंतर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना विशेष आर्थिक मदत दिली जाईल. चित्रपट अभिनेते नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांच्या मदतकार्यापासून महिला मंचने प्रेरणा घेऊन हा निर्णय घेतला असल्याचेही मंचतील महिलांनी स्पष्ट केले.
गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
आई तुळजा भवानी महिला मंचच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रमसुद्धा राबविले जातात. यात दरवर्षी गुणवंत विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार केल्या जातो. तसेच स्वयंरोजगार सुरू करू न स्वत:च्या पायावर उभे होणाऱ्या महिलांचा गौरव करू न त्यांना प्रोत्साहित केल्या जाते. पतसंस्थेच्या माध्यमातून नफा मिळविणे हा मुळीच हेतू नसून केवळ गरजू व गरीब महिलांना आर्थिक मदत करणे, हा यामागील मुख्य उद्देश असल्याचे यावेळी संस्थेच्या अध्यक्षा डॉ. सुनेत्रा येवले यांनी सांगितले.
सांस्कृतिक कार्यक्रम
या मंचच्यावतीने दरवर्षी विविध सांस्कृतिक उपक्रम आयोजित केले जातात. याशिवाय रक्तदान शिबिर, दसरा, दिवाळी व कोजागिरीसारख्या उत्सवानिमित्त हळदीकुंकवाचे कार्यक्रम साजरे केले जातात. याशिवाय सर्व सभासदांची सामूहिक सहलसुद्धा आयोजित केल्या जाते. यातून सभासदांमध्ये एक सलोखा निर्माण करणे, हा मुख्य उद्देश असल्याचे मंचच्या अध्यक्षा येवले म्हणाल्या. महिला मंचच्या माध्यमातून महिलांची एक पतसंस्था उभी करण्यात एक मार्गदर्शक म्हणून गंगाधर बोबडे यांचा मोलाचा वाटा असल्याचे त्यांनी सांगितले.
असा आहे, महिला मंच
अध्यक्षा : डॉ. सुनेत्रा येवले, कार्याध्यक्षा : माधुरी मुलनकर, उपाध्यक्षा : सोनम लाखे, सचिव अर्चना लांडे, सहसचिव : दीपा टाकळकर, कोषाध्यक्षा : रत्ना गुलधे, सभासद : वृंदा काटकर, कविता नितनवरे, सुनीता राऊत, लिना भोंडे, पद्मजा गोडे, संगीता येवले, स्मिता बोबडे व संध्या धाकतोड यांचा समावेश आहे.