सत्ताधाऱ्यांची शाळेवर सावध भूमिका !
By admin | Published: July 18, 2015 02:51 AM2015-07-18T02:51:13+5:302015-07-18T02:51:13+5:30
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना केंद्र्र सरकारकडून झेड प्लस सुरक्षा दिली जाणार आहे.
सरसंघचालकांच्या सुरक्षेचा मुद्दा : विरोधकांची चर्चेची तयारी
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना केंद्र्र सरकारकडून झेड प्लस सुरक्षा दिली जाणार आहे. सुरक्षेची जबाबदारी सीआयएसएफ विभागाकडे राहणार आहे. या जवानांच्या निवासासाठी उंटखाना येथील महापालिके च्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर माध्यमिक शाळा व ज्युनियर कॉलेजची इमारत उपलब्ध करण्याचा प्रस्ताव आहे. यावर चर्चा करण्यासाठी काँग्रेसने तयारी केली आहे. दुसरीकडे सत्ताधारी भाजपने सावध भूमिका घेतली आहे. २०जुलैच्या सभेत हा मुद्दा गाजण्याचे संकेत आहेत.
शु्रक्रवारी सत्तापक्ष व काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांच्या वेगवेगळ्या बैठकी झाल्या. या मुद्यावर चर्चा करण्याचा निर्णय काँगे्रेसच्या बैठकीत घेण्यात आला. काँगे्रेससोबतच विरोधी सदस्यांचाही या प्रस्तावाला विरोध आहे. या मुद्याला लोकांचा पाठिंबा मिळविण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे. दुसरीकडे यावरून वाद न वाढविता सावध भूमिका घेण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे.
शाळा व कॉलेजची जागा वार्षिक ४,७२,९१५ रुपये भाडे तत्त्वावर उपलब्ध करण्याचा प्रस्ताव असला तरी या प्रस्तावाला विरोध झाल्यास रेशीमबाग येथील बंद पडलेली शाळा भाड्याने देण्याचा प्रस्ताव पुढे येण्याची शक्यता आहे. शाळेच्या मुद्यावर कोणत्याही पक्षाने अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. मागील ११ व या सभेतील २० असे ३१ प्रश्न कामकाजात समाविष्ट करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)