पोलीस आयुक्तांचा पॉवरफुल शॉट; मध्य भारतातील बुकींची दाणादाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2020 11:22 AM2020-10-15T11:22:15+5:302020-10-15T11:22:58+5:30
Cricket Nagpur News betting पोलीस आयुक्तांनी मारलेल्या पॉवरफुल शॉटमुळे मध्यभारताच्या बुकी बाजाराची दाणादाण उडाली आहे.
नरेश डोंगरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पोलीस आयुक्तांनी मारलेल्या पॉवरफुल शॉटमुळे मध्यभारताच्या बुकी बाजाराची दाणादाण उडाली आहे. हवाला बाजारालाही मोठी धडकी भरली आहे. परिणामी मध्य भारतातील बुकींची नजर गोव्याच्या गॉडफादरकडे वळली आहे.
देश-विदेशातील बुकींच्या संपर्कात असलेल्या येथील काही बुकींनी नागपूरला मध्य भारताचे क्रिकेट सट्ट्याचे सर्वात मोठे सेंटर बनविले आहे. दलालांच्या मार्फत कुणालाही मॅनेज करू शकतो, असा गैरसमज करून घेणाऱ्या येथील बुकींनी
आयपीएलचा रणसंग्राम सुरू होताच क्रिकेट सट्टा बाजार चांगलाच गरम केला होता. दोन आठवड्यात त्यांनी दहा ते बारा हजार करोड रुपयांची लगवाडी खायवाडी करून घेतली होती. फिक्सर, सेटर सर्वच बिनधास्त असताना पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सोमवारी रात्री बुकी बाजारात बॉल टाकला. त्यानुसार संजय ऊर्फ छोटू अग्रवाल, जितू कामनानी, शंकर कक्कड, शैलेश लखोटिया, प्रशांत शहा, अभिषेक लुणावत, पंकज वाणी यांना उचलण्यात आले. उपरोक्त मंडळीमध्ये बुकी, सेटर, फिक्सर आणि क्रिकेट सट्टा तसेच हवालाचा कारभार सांभाळणाऱ्या मंडळींचा समावेश आहे. त्यांना रात्रीत विशिष्ट धडा देण्यात आला.
पोलीस आयुक्तांच्या या एकाच बॉलने नागपूरच्या बुकी बाजारातील अनेक खेळाडूची प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष बेदम धुलाई झाल्याने मंगळवारी आयपीएलच्या सट्ट्याचा सामना नागपुरात झालाच नाही. भंडारा, वर्धा आणि चंद्रपूरमध्ये थोडीफार लगवाडी झाली. मात्र कटिंग कुठे करायची, असा प्रश्न असल्याने अनेकांनी आपला गाशा गुंडाळला.
विशेष म्हणजे, नागपूरच्या बुकिंगचे मुख्य कटिंग सेंटर गोव्यात आहे. नागपुरातील अनेक बुकींनी गोव्यात आपली दुकानदारी थाटली आहे. क्रिकेट सट्टेवाल्यांची नागपुरात धुलाई झाल्याचे आणि सगळ्यांच्या मोबाईलच्या लाईन तपासल्या जात असल्याची माहिती कळाल्याने क्रिकेट आणि नागपूर बुकीचे कनेक्शन कटले आहे. त्यामुळे आता येथील बुकींच्या नजरा गोव्यातील गॉडफादरकडे लागल्या आहे. मंगळवारी अनेक जण दिल्ली, मुंबई, पंजाब, गोव्याच्या संपर्कात होते, अशीही सूत्रांची माहिती आहे.
जरीपटका ऑफ, खामला ऑन दणकेबाज कारवाईमुळे जरीपटक्यातील बुकी बाजार ऑफ झाला आहे. मात्र खामल्यातील छतानी आणि त्याचे पंटर, धरमपेठ येथील अतुल चंद्रपूर आणि कक्कड मामांची दिवसभर ऑफलाईन धावपळ सुरू होती, अशी सूत्रांची माहिती आहे.
शेकडो कोटींची उलाढाल बंद
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पहिल्याच फटक्यात नागपूरच्या बुकी बाजारातील शेकडो कोटींची उलाढाल बंद केली आहे. त्यामुळे आता येथील बुकी आणि हवाला व्यावसायिक दुसऱ्या पयार्याचा विचार करत असल्याचेही बोलले जात आहे.