पीपीई किट वाढवतेय डॉक्टरांचे आजार; नॉन लॅमिनेटेड किटची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2020 08:30 AM2020-09-20T08:30:54+5:302020-09-20T08:34:01+5:30
सहा तासांवर पीपीई किट घालणारे डॉक्टर व पॅरामेडिकल स्टाफ डिहायड्रेशन, डोके दुखी, चक्कर आणि वाढत्या रक्तदाबाच्या समस्येला बळी पडत आहेत. लॅमिनेटेड असलेली ही किट याला कारणीभूत ठरत आहे.
सुमेध वाघमारे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाबाधितांचे जीव वाचविण्यासाठी सतत रुग्णालयात सेवा देणारे डॉक्टर आता संरक्षणात्मक पीपीई किट घालून आजारी पडत आहेत. सहा तासांवर पीपीई किट घालणारे डॉक्टर व पॅरामेडिकल स्टाफ डिहायड्रेशन, डोके दुखी, चक्कर आणि वाढत्या रक्तदाबाच्या समस्येला बळी पडत आहेत. लॅमिनेटेड असलेली ही किट याला कारणीभूत ठरत आहे. मेयोमध्ये या किटमुळे चक्कर येऊन पडण्याच्या घटना वाढल्या आहेत. मेडिकलने या किटचा वापर करणेच बंद केले आहे.
कोरोनाबाधितांच्या संख्येत कमालीची वाढ होत आहे. मेयो, मेडिकलचे वॉर्ड फुल्ल होण्याच्या मार्गावर आहे. विशेषत: अतिदक्षता विभागात खाट मिळणे कठीण झाले आहे. अशा युद्धजन्य स्थितीत खऱ्या अर्थाने डॉक्टर लढवय्यांसारखे काम करीत आहेत. कोरोनाबाधितांचे वॉर्ड डॉक्टरांसाठी हॉटस्पॉट झाले आहे. संसर्ग टाळण्यासाठी पीपीई किटचा वापर के ला जातो. मात्र महागडी किट व मागणीच्या तुलनेत पुरवठा अल्प होत असल्याने डॉक्टरांना साधारण सहा ते आठ तास ते घालून रहावे लागते. एकदा किट घातल्यास खाणेपिणे करता येत नाही. वॉशरूममध्ये जाणे देखील टाळले जाते. काही डॉक्टर्स यासाठी ‘अॅडल्ट डायपर्स’चाही वापर करतात. ड्युटीची वेळ संपल्यावर व पीपीई किट काढून कचरापेटीमध्ये टाकल्यावरच ते सामान्य जीवनात परत येतात. यातच जिल्हा प्रशासनाकडून उपलब्ध झालेल्या पीपीई किट या लॅमिनेटेड म्हणजे प्लास्टिक कोट असलेल्या आहेत. यामुळे इतर किटपेक्षा या किटच्या मोठ्या त्रासाला निवासी डॉक्टर व इन्टर्नला सामोरा जावे लागत असल्याच्या तक्रारी आहेत.
तासा दोन तासातच संपूर्ण कपडे ओले होतात
एका निवासी डॉक्टरने सांगितले, लॅमिनेटेड किट घालून रुग्णसेवा देणे कठीण झाले आहे. ही किट घातल्यानंतर शरीराला हवा मिळत नाही. घाम इतका येतो की तास दोन तासातच संपूर्ण कपडे ओले होतात. डोळ्यात घाम येणे, जळजळ होण्यास कारणीभूत ठरते. सतत ग्लोब घातल्यामुळे त्वचेची समस्या निर्माण होते. पीपीई किट घालण्यापूर्वी डोके कव्हर घातले जाते, ज्यामुळे डोकेदुखी होते. तर, सतत मास्क घातल्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो. यामुळे हृदयाचा ठोका वाढतो. परिणामी, डॉक्टर चक्कर येऊन पडण्याचा घटना वाढल्या आहेत.
मेयो, मेडिकलला मिळाल्या आठ हजारांवर लॅमिनेटेड पीपीई किट
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, जुलै महिन्यात जिल्हा प्रशासनाकडून मेयो, मेडिकलला आठ हजारांवर लॅमिनेटेड पीपीई किट उपलब्ध करून दिल्या. किटची खरेदी करण्यापूर्वी दोन्ही रुग्णालय प्रशासनाला विचारात घेतले नाही. या किटचा आता वापर वाढल्याने त्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. किट घालून निवासी व इन्टर्न डॉक्टर चक्कर येऊन पडत असल्याच्या घटना वाढताच मेडिकलने या किटचा वापर थांबविल्याचीही माहिती आहे. मेयोतील निवासी डॉक्टरांची संघटना मार्ड संघटेनेचीही या किटबाबत तक्रारी आहेत.
नॉन लॅमिनेटेड पीपीई किटची गरज
औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात लॅमिनेटेड पीपीई किटच्या वापरामुळे अनेक निवासी डॉक्टरांना त्वचेच्या समस्या निर्माण झाल्या होत्या. ही बाब रुग्णालय प्रशासनाच्या लक्षात येताच त्यांनी लॅमिनेटेडच्या जागी नॉन लॅमिनेटेड किट उपलब्ध करून दिल्या. यामुळे बराच त्रास कमी झाल्याचे सांगण्यात येते. मेयो, मेडिकलमध्येही अशा किट उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.