संगीताच्या क्षितिजावर चकाकणारा ‘प्रभाकर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 01:20 AM2018-07-27T01:20:52+5:302018-07-27T01:22:40+5:30

संगीत म्हणजे मानवाच्या नसानसात भिनलेले रसायन. संगीत ऐकण्यासाठी सुमधूर आणि सहज असते, शिकण्यासाठी मात्र तेवढेच कठीण. ही एक विशाल महासागराप्रमाणे असलेली कला, जी आत्मसात करण्यासाठी ‘गुरु’शिवाय पर्याय नाही. म्हणूनच संगीत क्षेत्रातील गुरू-शिष्य परंपरेला आजही महत्त्व आहे. या गुरू-शिष्य परंपरेत संगीताच्या क्षितिजावर चमकणारा सूर्य म्हणजे सूरमणी पं. प्रभाकर धाकडे गुरुजी. नावाला सार्थ करीत स्वत:तील प्रतिभेतून असंख्य प्रतिभावान शिष्य घडविलेल्या या गुरुने संगीताच्या नभावर स्वत:ची प्रभा पसरविली आहे. वाद्ययंत्रांवर लीलया हात फेरत कर्णमधूर स्वरांचे अदभूत कौशल्य लाभलेल्या या कलावंताने कोमलहृदयी स्वभावामुळे संगीताच्या दुनियेचे श्रेष्ठत्व, नव्हे संतत्व प्राप्त केले आहे.

'Prabhakar' glittering on the horizon of music | संगीताच्या क्षितिजावर चकाकणारा ‘प्रभाकर’

संगीताच्या क्षितिजावर चकाकणारा ‘प्रभाकर’

Next
ठळक मुद्देशिष्य घडविणारा प्रज्ञाचक्षू : जातीधर्मापलिकडील सांगितिक प्रवास

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : संगीत म्हणजे मानवाच्या नसानसात भिनलेले रसायन. संगीत ऐकण्यासाठी सुमधूर आणि सहज असते, शिकण्यासाठी मात्र तेवढेच कठीण. ही एक विशाल महासागराप्रमाणे असलेली कला, जी आत्मसात करण्यासाठी ‘गुरु’शिवाय पर्याय नाही. म्हणूनच संगीत क्षेत्रातील गुरू-शिष्य परंपरेला आजही महत्त्व आहे. या गुरू-शिष्य परंपरेत संगीताच्या क्षितिजावर चमकणारा सूर्य म्हणजे सूरमणी पं. प्रभाकर धाकडे गुरुजी. नावाला सार्थ करीत स्वत:तील प्रतिभेतून असंख्य प्रतिभावान शिष्य घडविलेल्या या गुरुने संगीताच्या नभावर स्वत:ची प्रभा पसरविली आहे. वाद्ययंत्रांवर लीलया हात फेरत कर्णमधूर स्वरांचे अदभूत  कौशल्य लाभलेल्या या कलावंताने कोमलहृदयी स्वभावामुळे संगीताच्या दुनियेचे श्रेष्ठत्व, नव्हे संतत्व प्राप्त केले आहे.
एखादा विद्यार्थी संगीत आत्मसात करण्याची इच्छा व्यक्त करीत असताना गुरुही तेवढाच साधक असणे आवश्यक आहे. अशी समर्पणाची भावना असलेले गुरु शोधावे लागत असल्याची खंत एका कलावंताने व्यक्त केली. सुदैवाने पं. प्रभाकर धाकडे यांच्या रुपाने असा गुरु आपल्यात आहे. त्यांचे व्हायोलिनवरील सूर म्हणजे ऐकणाऱ्याला मोहून टाकणारे. तबला आणि हार्मोनियमवरही तेवढीच हातोटी. गळ्यात लाभलेल्या स्वरमाधुर्याने यात भर घातली आहे. याहून श्रेष्ठ म्हणजे शास्त्रीय संगीतापासून सुगम संगीताचे बारकावे शिष्यांना सहजपणे शिकविण्याचे कौशल्य. या प्रतिभेत मनमिळावू स्वभाव, विचारांची प्रामाणिकता, पारदर्शकता आणि प्रगल्भतेमुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व अधिकच प्रभावी ठरले आहे. हे सर्व गुण असलेल्या व्यक्तिमधील अंधत्वाची उणीव कुणालाही जाणवणार नाही.
वयाच्या तिसºया वर्षी त्यांना अंधत्व आले. मात्र ते संगीताच्या सोबतीने प्रकाशित झाले. संगीताचा वारसा हा त्यांना घरातूनच मिळाला. संगीत नाटकात काम करणारे वडील बालाजीपंत तबलावादक व पेटीमास्तर म्हणून प्रसिद्ध. मोठा भाऊ भास्कर उत्तम तबलावादक व दुसरा भाऊ वामन उत्तम गायक व हार्मोनियम वादक आणि बहीणही तेवढीच प्रतिभावान गायिका. त्यामुळे संगीताची आवड होतीच. त्यातून त्यांनी स्वत:च्या कौशल्याने व्हायोलिन आत्मसात केले. मोठा भाऊ भास्कर यांच्या अपघाती निधनानंतर वडिलांनी इंदोरा येथे भास्कर संगीत विद्यालयाची स्थापना केली. कदाचित नागपुरातील ते पहिले संगीत विद्यालय. वडिलांच्या निधनानंतर या विद्यालयाची संपूर्ण जबाबदारी धाकडे गुुरुजी यांच्यावर आली. पाचपावलीच्या एससीएस गर्ल्स हायस्कूलमध्ये संगीत शिक्षक म्हणून नोकरी पत्करलेल्या गुरुजींनी वडिलांच्या संगीत विद्यालयाची जबाबदारी आजतागायत अतिशय यशस्वीपणे समर्पणाने सांभाळली.
पाचपावलीच्या एससीएस गर्ल्स हायस्कूलमध्ये संगीत शिक्षक म्हणून नोकरी पत्करलेल्या गुरुजींनी वडिलांच्या संगीत विद्यालयाची जबाबदारी आजतागायेत अतिशय यशस्वीपणे समर्पणाने सांभाळली. यातून त्यांच्यातील प्रतिभा बहरत गेली. ते गुरू होण्याआधी समर्पित शिष्य झाले. संगीत क्षेत्रात काम करताना शास्त्रीय संगीताचे बारकावे माहिती असण्याची जाणीव त्यांना होती. त्यामुळे त्यांनी पं. जगदीशप्रसाद शर्मा यांच्याकडून शास्त्रीय संगीताचे धडे घेतले. वडील आणि पं. शर्मा यांचे शिष्यत्व आत्मसात केल्याने प्रगल्भ झालेले प्रभाकर धाकडे यांनी या पवित्र कार्यासाठी स्वत:ला वाहून घेतले.
स्वत: उत्तम संगीत दिग्दर्शक, गायक आणि वादक असल्याने धाकडे गुरुजी त्यांच्याकडे येणाºया प्रत्येक शिष्याच्या मनाची पकड घेतात. त्यांच्यातील गुणांची पारख करून त्यांच्या गुणकौशल्याप्रमाणे प्रत्येक शिष्यातील कलाकार घडवितात. एक कलाकार म्हणून ते जसे रसिकांच्या मनाचा ठाव घेतात तसेच गुरू म्हणूनही शिष्यांच्या मनाचा ठाव घेतात. दृष्टीहिन असूूनही शिष्यांच्या मनात डोकावणारा हा गुरू म्हणूनच विद्यार्थ्यांसाठी प्रिय आहे. हा वारसा जातीधर्मापलीकडे नेत त्यांनी अनेक शिष्यांच्या प्रतिभेला नवे आयाम दिले. गेल्या ५० वर्षातील प्रवासात त्यांनी संगीताचे आकाश व्यापले असून त्यांच्या शिष्यांनी देशविदेशात नावलौकिक मिळविला आहे. त्यांच्या ख्यातीमुळे देशातीलच नाही तर विदेशातील विद्यार्थीही शिष्यवृत्ती घेऊन त्यांच्याकडे संगीताचे धडे घेण्यासाठी येतात. शेकडोंना त्यांनी घडविले आहे. शेकडो संगीत विशारद झाले, अनेकांनी या क्षेत्रात ठसा उमटविला, चित्रपट क्षेत्रातही यशस्वी झाले आहेत.
या शिष्यांसोबत त्यांनी देशविदेशात अनेक कार्यक्रम केले. इटली, फ्रान्स, जर्मनी, अमेरिका, दुबई अशा अनेक देशात कार्यक्रम सादर करणाºया कलावंतांमध्ये धाकडे गुरुजी यांचे नाव अग्रगण्य ठरले आहे. अनेक दिग्गज गायकांनी त्यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतांना आवाज दिला आहे. कॅसेट, सीडी, अल्बम बनविण्यासह काही मराठी चित्रपटांसाठी त्यांनी संगीतही दिले आहे. पवित्र अशा संगीत क्षेत्राची अव्याहतपणे सेवा करणारा हा कलावंत नागपूरच नाही तर या देशाचा मानबिंदू ठरला आहे.
 बुद्ध-भीम गीतांना नवी ओळख
तथागत बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब यांची गाणी लोकपरंपरेतून आली होती. या लोकगीतांना सुरूमणी प्रभाकर धाकडे यांनी शास्त्रीय आणि सुगम संगीताची जोड देऊन भावगीतात रूपांतरित केले. त्यांच्या प्रयत्नांमुळे बुद्ध-भीम गीतांना नवे आयाम प्राप्त झाले आहे.
शिष्यांची समृद्ध परंपरा
कुंभाराने मातीला आकार द्यावा तसे त्यांनी शिष्यांच्या प्रतिभेला आकार दिला असून त्यांचे असंख्य शिष्य संगीताच्या विविध क्षेत्रात यशस्वी ठरले आहेत. या कलावंतांनी शास्त्रीय आणि सुगम संगीतात वेगळा ठसा निर्माण केला आहे. छाया वानखेडे-गजभिये, स्नेहाशिष दास, अनिल खोब्रागडे, वैशाली माडे, आकांक्षा नगरकर, श्रीनिधी घटाटे, पद््मश्री मानेकर, कल्पना लेहगावकर, मीनाक्षी नागदिवे, अहिंसा तिरपुडे, सरिता बोदिले, माणिक उबाडे, हेमलता पोपटकर, गौरी मुदलियार, प्रीती धाकडे, प्रसिद्ध गझल गायक हमिद हुसैन, संगीतकार भूपेश सवाई, पौर्णिमा माटे, सुजाता त्रिवेदी, शास्त्रीय गायक शाम जैन, श्रेया जैन, मोहिनी बरडे, पराग काडीकर, शरद आटे, सिद्धांत इंगळे, वीणा चटर्जी, बासरी वादक प्रेम शर्मा असे कितीतरी नाव घेता येतील. धाकडे गुरुजींचा मुलगा मंगेश धाकडे यांनी अनेक मराठी चित्रपटाचे संगीत दिले आहे.

 

Web Title: 'Prabhakar' glittering on the horizon of music

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.