प्रभावती गुप्त हीच मुद्रांक उमटविणारी पहिली महिला शासक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2021 10:45 AM2021-10-18T10:45:58+5:302021-10-18T12:56:40+5:30
नगरधन परिसरात झालेल्या उत्खननादरम्यान प्रभावती गुप्तच्या शासनकाळातील मुद्रांकाचा शाेध घेण्यात यश आले असून त्याबाबतची रिपाेर्ट नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे.
वसीम कुरैशी
लोकमत एक्सक्लुसिव्ह
नागपूर : १६०० वर्षांपूर्वी सम्राट चंद्रगुप्त माैर्य यांची मुलगी व कुमार गुप्त यांची बहीण प्रभावती गुप्त हीच विदर्भाची पहिला महिला शासक असून आजचे नगरधन हेच प्रभावतीचे नंदीवर्धन राज्य असल्याचा खुलासा पुरातत्व विभागाने केला आहे. नगरधन परिसरात झालेल्या उत्खननादरम्यान प्रभावती गुप्तच्या शासनकाळातील मुद्रांकाचा शाेध घेण्यात यश आले असून त्याबाबतची रिपाेर्ट नुकतीच प्रकाशित करण्यात आली. राणी प्रभावती गुप्त याच स्वत:चे मुद्रांक काढणाऱ्या देशातील पहिल्या महिला शासक असल्याचा दावाही संशाेधकांनी केला आहे.
राज्य पुरातत्व विभाग व डेक्कन काॅलेज पुणे यांनी २०१५ ते २०१८ या काळात संयुक्तपणे तीन टप्प्यांत उत्खनन करून अभ्यास केला. या पथकामध्ये राज्य पुरातत्व विभागाचे तत्कालीन सहसंचालक डाॅ. विराग साेनटक्के, डाॅ. श्रीकांत गणवीर आणि डाॅ. शंतनू वैद्य यांचा सहभाग हाेता. इ.स. ३८० मध्ये वाकाटक नरेश रुद्रसेन द्वितीय यांच्याशी प्रभावतीचे लग्न लागले. शैव अनुयायी असलेल्या रुद्रसेन यांनी विवाहानंतर प्रभावती यांच्या वैष्णव मान्यतेचा स्वीकार केला.
अल्प काळात ३९० मध्ये राजा रुद्रसेन यांचा मृत्यू झाला. त्यानंतर राणी प्रभावतीने १५ वर्षांपर्यंत दिवाकर सेन व दामाेदर सेन या अल्पवयीन मुलांची संरक्षिका म्हणून शासन चालविले. दरम्यान प्रभावती यांच्या शासनकाळातच दिवाकर सेनचा मृत्यू झाला व वय झाल्यानंतर दामाेदर सेनला सिहांसनावर बसविण्यात आले. येथेच इ.स. ४१० मध्ये प्रवरसेन द्वितीय यांनी वाकाटक शासन स्थापित केले आणि नंदीवर्धनऐवजी प्रवरपूरला राजधानी बनविले.
नगरधनमध्ये मिळाले दाेन मुद्रांक
राज्य पुरातत्व विभागाचे तत्कालीन सहसंचालक व सध्या बीएचयूचे प्राध्यापक डाॅ. विराग सोनटक्के यांनी सांगितले, यापूर्वीही मनसरमध्ये मुद्रांक मिळाले हाेते; पण त्यावर पुरव आक असे अंकित हाेते. मात्र, नगरधनमध्ये सापडलेल्या दाेन मुद्रांकावर राणी प्रभावतीचे नाव स्पष्ट लिहिले आहे. यावरून स्वत:च्या नावे मुद्रांक चालविणारी राणी प्रभावती हीच देशातील पहिली महिला शासक असल्याचे डाॅ. साेनटक्के यांनी स्पष्ट केले.