सत्यपाल महाराज यांना प्रबोधनकार ठाकरे पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 11:05 PM2019-09-17T23:05:36+5:302019-09-17T23:09:13+5:30
सप्तखंजेरी भजनांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील संत व महापुरुषांचे परिवर्तनवादी विचार आकर्षक शैलीत लोकांपर्यंत पोहचवून समाज प्रबोधन करणारे सत्यपाल महाराज यांना २०१८ चा प्रबोधनकार ठाकरे समाज प्रबोधन पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सामाजिक आणि सांस्कृतिक परिवर्तनासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना मारवाडी फाऊंडेशनच्यावतीने स्व. प्रबोधनकार ठाकरे समाज प्रबोधन पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. याच श्रुंखलेत सप्तखंजेरी भजनांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील संत व महापुरुषांचे परिवर्तनवादी विचार आकर्षक शैलीत लोकांपर्यंत पोहचवून समाज प्रबोधन करणारे सत्यपाल महाराज यांना २०१८ चा प्रबोधनकार ठाकरे समाज प्रबोधन पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
फाऊंडेशनच्यावतीने येत्या २१ सप्टेंबर रोजी साई सभागृह, शंकरनगर येथे सायंकाळी ५.३० वाजता आयोजित भव्य समारोहात सत्यपाल महाराज यांना हा पुरस्कार सन्मानपुर्वक प्रदान करण्यात येणार आहे. तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून यावेळी राज्याचे माजी मंत्री शशिकांत सुतार, माजी खासदार अजय संचेती प्रामुख्याने उपस्थित राहतील. लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा यांच्या अध्यक्षतेत हा समारोह होईल. प्रबोधनकार ठाकरे यांच्या परिवर्तनवादी कार्याला मानाचा मुजरा करण्यासाठी मारवाडी फाऊंडेशनतर्फे दरवर्षी त्यांच्या नावाने प्रबोधनाचे कार्य करणाऱ्या मान्यवर व्यक्तीला हा पुरस्कार देण्यात येतो. गेल्या अनेक वर्षापासून सत्यपाल महाराज यांनी अनोख्या शैलीने व सप्तखंजेरीने लोकांमध्ये परिवर्तनाचे विचार पोहचविले आहेत. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येत असल्याचे फाऊंडेशनचे डॉ. गिरीश गांधी यांनी सांगितले.