शिस्त व संस्कारांचे पूजन

By admin | Published: October 19, 2015 03:06 AM2015-10-19T03:06:56+5:302015-10-19T03:06:56+5:30

शिस्तबद्ध संचलन, प्रत्येक पावलात दिसून येणारी लयबद्धता आणि प्रात्यक्षिकांमधून दिसून येणारी उर्जा.

Practice of discipline and sanskar | शिस्त व संस्कारांचे पूजन

शिस्त व संस्कारांचे पूजन

Next

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ : शिशू व बाल स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव
नागपूर : शिस्तबद्ध संचलन, प्रत्येक पावलात दिसून येणारी लयबद्धता आणि प्रात्यक्षिकांमधून दिसून येणारी उर्जा. प्रत्येक नजरेत प्रखर आत्मविश्वास अन् मनात देशाच्या प्रगतीची आस. उपराजधानीतील चारही भागांमध्ये रविवारी सायंकाळी वयाने लहान परंतु दांडगा उत्साह अंगी बाळगलेल्या स्वयंसेवकांनी शिस्त व संस्कारांचे दर्शन घडवले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, नागपूर महानगराच्या बाल व शिशू स्वयंसेवकांच्या विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सवाचे आयोजन शहरातील ४ विविध मैदानांवर करण्यात आले होते. सर्वच ठिकाणांवर बाल स्वयंसेवकांनी उपस्थितांसमोर निरनिराळी प्रात्यक्षिके सादर केली. यात लेझिम, योगासने, कवायती, दंडयोग यांचा प्रामुख्याने समावेश होता. कार्यक्रमाअगोदर या चारही ठिकाणी बाल स्वयंसेवकांचे पथसंचलन झाले. यावेळी ठिकठिकाणच्या संघ शाखेचे स्वयंसेवक व नागरिक उपस्थित होते. शहरातील ज्येष्ठ स्वयंसेवकांनीदेखील यावेळी आवर्जून उपस्थित राहून या बालकांचा हुरूप वाढविला. (प्रतिनिधी)

बजाजनगर मैदान
धरमपेठ, त्रिमूर्तीनगर व सोमलवाडा भागातील बाल व शिशू स्वयंसेवकांचा उत्सव रविवारी सायंकाळी ५.३० वाजता बजाजनगर मैदान येथे पार पडला. नागपूर सायकॅट्रीक सोसायटीचे सचिव व मानसोपचारतज्ज्ञ डॉ. सुशील गावंडे येथे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. चरित्रनिर्माण ही बलशाली राष्ट्राच्या निर्मितीची पहिली पायरी असते. लहान वयात जास्तीत जास्त प्रमाणात महान व्यक्तींची चरित्रं वाचली पाहिजेत. विशेष म्हणजे पालकांनी लहान मुलांमध्ये राष्ट्रीयत्व आणि देशप्रेमाची भावना जागृत केली पाहिजे, असे मत डॉ. गावंडे यांनी व्यक्त केले. यावेळी डॉ. विलास डांगरे, विदर्भ प्रांत प्रचारप्रमुख अतुल पिंगळे हे प्रामुख्याने उपस्थित होते.

महावीरनगर मैदान, नंदनवन
अजनी, अयोध्या व नंदनवन भागातील बाल व शिशु स्वयंसेवकांच्या विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सवाचे आयोजन नंदनवन येथील महावीरनगर मैदानावर करण्यात आले होते. शिवलक्ष्मी शिक्षण व सांस्कृतिक संस्थेचे सचिव अनिल महाजन हे प्रमुख अतिथी होते. पाश्चिमात्य नागरिकांना स्वत:च्या संस्कृतीचे धोके कळले आहेत. परिणामी भारतीय नागरिकांनी पाश्चिमात्य संस्कृतीचे आचरण करण्यात काहीच अर्थ नाही. आई-वडिलांनी दिलेल्या चांगल्या संस्काराचे पालन करण्याची प्रतिज्ञा करा, असे आवाहन महाजन यांनी केले. यावेळी विदर्भ प्रांत सहसंघचालक रामभाऊ हरकरे, नागपूर महानगर सहकार्यवाह उदय वानखेडे, अयोध्या भाग संघचालक मनोहर सपकाळ व अजनी भाग संघचालक सुभाषचंद्र देशकर प्रामुख्याने उपस्थित होते.

बौद्ध पार्क, इंदोरा
लालगंज, बिनाकी, सदर व गिट्टीखदान येथील बाल-शिशू स्वयंसेवकांचा उत्सव इंदोरा येथील बुद्ध नगरातील बौद्ध पार्क येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी ज्येष्ठ संशोधक डॉ. राजपालसिंह कश्यप हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. आपल्या देशाने जगाला जीवनमूल्ये दिली आहेत. देशाचा विकास करायचा असेल तर पुढील पिढीने एकजूट होऊन काम करण्याची आवश्यकता आहे. रोजच्या जीवनात शिस्तबद्ध सवयी लावल्या पाहिजेत व तंत्रज्ञानाचा उपयोग चांगले चरित्र घडविण्यासाठी करण्यात यावा, असे मत त्यांनी व्यक्त केले.

नासुप्र मैदान, वर्धमाननगर
इतवारी व मोहिते भागातील बाल व शिशु स्वयंसेवकांच्या विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सवाचे आयोजन पूर्व वर्धमाननगरातील नागपूर सुधार प्रन्यासच्या मैदानावर झाले. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे सहयोगी प्राध्यापक बालरोगतज्ज्ञ डॉ. चारुहास आकरे हे प्रमुख अतिथी होते. नि:स्वार्थ मानवसेवा हीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची खरी ओळख आहे. सध्या डेंगू आजार रावणाप्रमाणे थैमान घालत आहे. यामुळे या विजयादशमीनिमित्त घर व परिसर स्वच्छ करून रावणरुपी डेंगूवर विजय मिळवावा असे आवाहन डॉ. आकरे यांनी केले. यावेळी महानगर संघचालक राजेश लोया, इतवारी भाग संघचालक संजय शिरपूरकर व मोहिते भाग संघचालक अशोक भट उपस्थित होते

Web Title: Practice of discipline and sanskar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.