विदर्भ साहित्य संघाच्या अध्यक्षपदी प्रदीप दाते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2022 03:15 PM2022-10-19T15:15:59+5:302022-10-19T15:19:29+5:30
प्रदीप दाते हे विद्यमान कार्यकारिणीत शाखा समन्वयक म्हणून कार्यरत आहेत.
नागपूर : मनोहर म्हैसाळकर यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या विदर्भ साहित्य संघाच्या अध्यक्षपदी प्रदीप दाते यांची निवड करण्यात आली आहे. आज (दि. १९) झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत ही निवड करण्यात आली.
विदर्भ साहित्य संघाच्या कार्यालयात सा. संघाचे सरचिटणीस विलास मानेकर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. यात अध्यक्षपदासाठी दाते यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. प्रदीप दाते हे विद्यमान कार्यकारिणीत शाखा समन्वयक म्हणून कार्यरत आहेत. त्यांना संस्थात्मक कार्याचा दीर्घ अनुभव असून ते गेल्या सुमारे चार दशकांपासून सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात सक्रीय आहेत. यशवंतराव दाते स्मृती प्रतिष्ठानचे ते अध्यक्ष असून अनेक संघटनांमध्ये विविध पदांवर कार्यरत आहेत. विदर्भ साहित्य संघाशी गेल्या तीन दशकांपासून ते संबंधित असून अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळात ते विदर्भ साहित्य संघाचे प्रतिनिधीत्व करीत आहेत.
महाराष्ट्रातल्या अनेक सामाजिक कार्यकर्त्यांशी व साहित्यिकांशी त्यांचे निकटचे संबंध आहेत. त्यांच्या नेतृत्वात विदर्भ साहित्य संघाचे कार्य समर्थपणे पुढे जाईल, असा विश्वास यावेळी कार्यकारिणीतर्फे व्यक्त करण्यात आला.