प्रदीप पोहाणे यांनी मनपा स्थायी समिती अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2019 08:32 PM2019-03-05T20:32:58+5:302019-03-05T20:34:04+5:30
भाजपाचे नगरसेवक प्रदीप पोहाणे यांनी मावळते अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांच्याकडून मंगळवारी महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. अध्यक्षांच्या कक्षात पदग्रहणप्रसंगी महापौर नंदा जिचकार आणि वीरेंद्र कुकरेजा यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी पोहाणे यांचे कुटुंबीयही उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भाजपाचे नगरसेवक प्रदीप पोहाणे यांनी मावळते अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांच्याकडून मंगळवारी महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. अध्यक्षांच्या कक्षात पदग्रहणप्रसंगी महापौर नंदा जिचकार आणि वीरेंद्र कुकरेजा यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी पोहाणे यांचे कुटुंबीयही उपस्थित होते.
तत्पूर्वी स्थायी समितीच्या विशेष सभेत प्रदीप पोहाणे यांची स्थायी समितीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. विरोधी पक्षाकडून उमेदवारी अर्ज न आल्याने जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अश्विन मुदगल यांनी पोहाणे बिनविरोध निवडून आल्याचे जाहीर केले. सत्तापक्षाने पोहाणे यांच्या नावाची घोषणा आधीच केली होती.
सर्वांची साथ, सर्वांना न्याय
स्थायी समिती अध्यक्षपदामुळे जबाबदारी वाढली आहे. समितीच्या माध्यमातून शहराचा विकास करताना सर्वांना सोबत घेऊ न व सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न राहील, अशी ग्वाही प्रदीप पोहाणे यांनी दिली. अध्यक्षपदी अविरोध निवड झाल्यानंतर मनपा मुख्यालयाच्या हिरवळीवर आयोजित पदग्रहण समारंभात ते बोलत होते.
अध्यक्ष म्हणून आता संपूर्ण शहराची जबाबदारी आपल्यावर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी, शहरातील सर्व आमदार, महापौर आणि मनपातील सर्व वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनात ही जबाबदारीही आपण यशस्वीपणे पार पाडू, असा विश्वास पोहाणे यांनी व्यक्त केला.
अध्यक्षस्थानी महापौर नंदा जिचकार होत्या. यावेळी मंचावर आ. सुधाकर देशमुख, भाजपचे शहर अध्यक्ष व आ. सुधाकर कोहळे, आ. कृष्णा खोपडे, आ.प्रा. अनिल सोले, आ. विकास कुंभारे, उपमहापौर दीपराज पार्डीकर, मनपातील सत्ता पक्षनेते संदीप जोशी, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, वीरेंद्र कुकरेजा, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांच्यासह समितीचे सदस्य व्यासपीठावर उपस्थित होते. महापौर नंदा जिचकार, सुधाकर देशमुख, सुधाकर कोहळे, कृष्णा खोपडे, तानाजी वनवे व वीरेंद्र कुकरेजा आदींनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाल्या बोरकर यांनी तर आभार प्रतोद दिव्या धुरडे यांनी मानले.
कार्यकर्ता ते अध्यक्ष
नवनिर्वाचित स्थायी समिती अध्यक्ष प्रदीप पोहाणे यांनी भारतीय जनता युवा मोर्चाचे मंत्री, उपाध्यक्ष आणि महामंत्री अशा जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. २०१२ ते २०१७ दरम्यान ते कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक होते. लकडगंज झोनचे सभापती म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. २०१७ च्या महापालिका निवडणुकीत पूर्व नागपुरातील प्रभाग २४ मधून दुसऱ्यांदा निवडून आलेले आहेत. २०१२ च्या निवडणुकीत वयाच्या २४ व्या वर्षी प्रभाग ३४ मधून नगरसेवक म्हणून निवडून आले होते.