व्यवहारवादाचे भयंकर सावट देशावर आहे - रणजित मेश्राम
By आनंद डेकाटे | Published: April 20, 2023 01:02 PM2023-04-20T13:02:59+5:302023-04-20T13:05:36+5:30
महावितरणतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १३२ व्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.
नागपूर : विचार, तत्व, प्रणाली यांना कुस्करून केवळ व्यवहारवादाचे स्तोम वाजविण्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कडाडून विरोध केला होता. आज नेमके तेच भारतात दिसत आहे. आजच्या व्यवहारवादाने इष्ट अनिष्ट कोणतेच वस्त्र अंगावर ठेवलेले नाही. अशातर्हेने विचारसरणीची लढाई लढायला सारेच दुबळे ठरत असतील तर हा नव्या अंधार युगाचा प्रारंभ म्हणता येईल, असे परखड मत ज्येष्ठ पत्रकार प्रा. रणजित मेश्राम यांनी व्यक्त केले.
महावितरणतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १३२ व्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महावितरणचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी हे होते. यावेळी मंचावर मुख्य अभियंते दिलीप दोडके होते. अभियंते अमित परांजपे, अनिल सहारे, अजय खोब्रागडे, हरिष गजबे, नारायण लोखंडे व महाव्यवस्थापक वित्त शरद दाहेवार हे आवर्जून उपस्थित होते.
रणजित मेश्राम म्हणाले, आर्थिक संरचनेला मुलभूत अधिकारात घ्यावे या बाबासाहेबांच्या वारंवारच्या आग्रहाकडे या देशाने दुर्लक्ष केले. ओबीसी वर्गवारीची जातसूची तयार नसतांना ३४० कलमात संविधानिक तरतूद करुन देण्याला ओबीसींनी दुर्लक्ष केले. अशा बऱ्याच अनुल्लेखित व दुर्लक्षित घटनांचा यावेळी आपल्या भाषणातून आढावा घेतला.
अध्यक्ष स्थानावरुन सुहास रंगारी यांनी प्रजा व नागरिक यातील भेद स्पष्ट केला. शिवाय, विविध प्रसंग व उदाहरणे सांगून बाबासाहेबांप्रती आपली कतज्ञता व्यक्त केली. मुख्य अभियंता दिलीप दोडके यांचेही समयोचित भाषण झाले. प्रास्ताविक सुशांत श्रृंगारे, संचालन बंडू शंभरकर व निशा चौधरी यांनी आभार मानले.