भाजपमधील मतभेद झाकण्यासाटी आघाडीच्या एकीवर स्तुतीसुमने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:09 AM2020-12-06T04:09:22+5:302020-12-06T04:09:22+5:30

नागपूर : भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा नागपूर पदवीधर मतदारसंघाचा बालेकिल्ला ढासळला. हा पराभव भाजप नेत्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला ...

Praise on the unity of the front to cover the differences in the BJP | भाजपमधील मतभेद झाकण्यासाटी आघाडीच्या एकीवर स्तुतीसुमने

भाजपमधील मतभेद झाकण्यासाटी आघाडीच्या एकीवर स्तुतीसुमने

Next

नागपूर : भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा नागपूर पदवीधर मतदारसंघाचा बालेकिल्ला ढासळला. हा पराभव भाजप नेत्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. पराभवाच्या २४ तासातच भाजपमध्ये चिंतन सुरू झाले आहे. मात्र, या पराभवामागे अंतर्गत वाद किंवा कुठलीही गटबाजी कारणीभूत नाही, हे दर्शविण्यासाठी भाजपचा खटाटोप सुरू आहे. उलट मतभेदांवर पांघरुण घालण्यासाठी तोंडभरून काँग्रेसने दाखविलेली एकी व तीन पक्षांनी मिळून केलेल्या कामाचे कौतुक केले जात आहे.

महाविकास आघाडीचे अ‍ॅड. अभिजित वंजारी यांनी भाजपचे महापौर संदीप जोशी यांचा १८ हजाराहून अधिक मतांनी पराभव केला. असा एकतर्फी निकाल भाजपला तर सोडा पण काँग्रेसलाही अपेक्षित नव्हता. हे यश मिळविण्यासाठी वंजारी यांनी घेतलेले परिश्रम नक्कीच नाकारता येणार नाही. मात्र, पक्षांतर्गत धुसफुसीवर पांघरुण घालण्यासाठी या विजयाला बहुजनवादाचा सदरा चढविण्याचेही काम जोरात सुरू आहे. मात्र, यापूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी आ. अनिल सोले हे भाजपकडून लढले तेव्हा यांच्या विरोधात हा बहुजनवाद का चालला नाही, यावर आत्मचिंतन करण्याची गरज आहे. संदीप जोशी यांच्या प्रचाराची धुरा खांद्यावर घेतलेले खा. रामदास तडस, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे, खा. सुनील मेंढे, आ. परिणय फुके, आ. पंकज भोयर, आ. दादाराव केचे, वर्धेचे नगराध्यक्ष अतुल तराळे आदी नेते बहुजन समाजातीलच आहेत. जनतेची नाडी ओळखणाºया नेत्यांना हवेचा अंदाज कसा आला नाही, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

घातपात झाल्याची भावना

- भाजपची संघटनात्मक बांधणी, कार्यकर्त्यांचे नेटवर्क व दिग्गज नेत्यांची फौज पाहता पदवीधरमध्ये पराभव होणे शक्य नाही. मात्र, त्यानंतरही चक्कर आणणारा निकाल आला. जवळच्यांनीच घातपात केला. अपेक्षित साथ मिळाली नाही, अशी भावना जोशी समर्थकांमध्ये आहे. पक्षशिस्तीचा भंग नको म्हणून ते उघडपणे बोलणे टाळत आहेत.

गडकरी समर्थकांचाच पत्ता कट का ?

- गेल्या विधानसभा निवडणुकीपासून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या समर्थकांचाच पत्ता का कट केला जात आहे, यावरही अता भाजपमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली आहे. लोकमतशी बोलताना भाजपचे एक ज्येष्ठ नेते म्हणाले, विधानसभा निवडणुकीत चंद्रशेखर बावनकुळे (कामठी), सुधाकर कोहळे (दक्षिण नागपूर) यांचे तिकीट ऐन वेळी का कापण्यात आले, याचे उत्तर अजून मिळालेले नाही. भंडारा जिल्ह्यात भाजपचे तीन आमदार होते. या तीनही आमदारांचे तिकीट कुणाच्या लॉबिंगमुळे व कुणाला खूश करण्यासाठी कापण्यात आले, यावर निकालानंतरही चिंतन झाले नाही. एवढ्यावरच हे सर्व थांबले नाही. आता पदवीधरमध्ये गडकरी यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे अनिल सोले यांचे तिकीट कापले. हे करताना गडकरींना खरोखर विश्वासात घेतले गेले का ? असा प्रश्न या नेत्याने उपस्थित केला. एकूणच आजवरच्या घडामोडींमुळे नाराज असलेले गडकरी समर्थक आता पदवीधरच्या निकालाचे निमित्त साधून भावना मोकळ्या करू लागले आहेत.

Web Title: Praise on the unity of the front to cover the differences in the BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.