'अनिल देशमुखांनी कोणाला तरी वाचवण्यासाठी स्वतःचा बळी देऊ नये'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2021 03:25 PM2021-11-09T15:25:01+5:302021-11-09T16:16:12+5:30
अनिल देशमुख हे एका प्रकरणात फसल्याचं दिसत आहे. त्यांनी कुणाला तरी वाचवण्यासाठी स्वत:चा बळी देऊ नये. गोळा केलेले पैसे कुणाला नेऊन दिले हे त्यांनी समोर आणावे आणि माफीचे साक्षीदार व्हावे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
नागपूर : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबाबत बोलताना खळबळजनक खुलासा केला आहे. देशमुख हे एका प्रकरणात फसल्याचं दिसत आहे. त्यांनी कुणाला तरी वाचवण्यासाठी स्वत:चा बळी देऊ नये. गोळा केलेले पैसे कुणाला नेऊन दिले हे त्यांनी समोर आणावं आणि माफीचे साक्षीदार व्हावे, असे आंबेडकर म्हणाले आहेत.
विशेष सत्र न्यायालयाने दिलेला निर्णय रद्द करत उच्च न्यायालयाच्या विशेष सुटीकालीन खंडपीठाने १२ नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावल्यानंतर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांचा सोमवारी ताबा घेत पुन्हा चौकशी सुरू केली आहे. त्यावरुन आंबेडकर यांनी हा खुलासा केला आहे. ते आज नागपुरात बोलत होते.
सध्या राज्याच्या राजकारणात गुन्हेगारीकरण आणि भ्रष्टाचार वाढत आहे. आज परिस्थिती अशी आहे की फक्त जे मोहरे आहे त्यांचे नाव पुढे येत आहे. मात्र, राजा आणि वजीराचे नाव पुढे येत नाही. देशमुखांचा बळी दिला जात आहे. कलेक्शन झालं पण तो पैसा देशमुख यांच्याकडे नाही. मग तो पैसा कुठे गेला हे देशमुखांनी सांगावं, असंही ते म्हणाले.
अशा स्थितीत न्यायालयाची भूमिका महत्वाची झाली आहे. न्यायालयाने राजकारणातील भ्रष्टाचार आणि गुन्हेगारीकरण बद्दलचे प्रकरण लवकर निकाली काढावे. तसेच, राज्याच्या राज्यपालाने ही या सर्व स्थिती बद्दल योग्य निर्णय घ्यावा असे आवाहनही आंबेडकर यांनी केलं आहे.
यासोबतच, देवेंद्र फडणवीस हे ५ वर्ष राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांना नवाब मलिक यांच्या कुटुंबातील लोकांनी दाऊदच्या माणसांकडून संपत्ती घेतल्याची माहिती होती. तेव्हा त्यांनी का हे प्रकरण उचलले नाही किंवा कारवाई केली नाही. आज जेव्हा त्यांच्यावर आरोप झाले, तेव्हा ते लक्ष दुसऱ्या बाजूला वेधण्यासाठी हे सर्व बाहेर आणत आहे, असा आपोपही आंबेडकर यांनी यावेळी केला.