"किमान समान कार्यक्रम ठरला तरच आघाडी; १९७७ ची पुनरावृत्ती होऊ नये"
By आनंद डेकाटे | Published: February 7, 2024 04:48 PM2024-02-07T16:48:05+5:302024-02-07T16:51:57+5:30
वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांचे विधान
आनंद डेकाटे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : निवडणूकीत जागा व मोदींचा पराभव हा नंतरचा भाग आहे. राजकारण होत राहील. परंतु, सत्तेत आल्यास काय करायचे याचा अजेंडा ठरला पाहिजे. म्हणूनच महाविकास आघाडीच्या बैठकीच्या प्रारंभापासून आपण किमान समान कार्यक्रमावर भर दिला. त्यासाठी आग्रह धरला. यासाठी वंचीतने शेतकऱ्यांच्या प्रश्नासह एकूण ३१ विषयांचा मसुदा तयार केला. आघाडीतील इतरांनीही तो तयार करावा. पुढील बैठकीत या मसुद्यावर चर्चा होईल. त्यानंतरच्या बैठकीत जागा वाटपावार चर्चा होईल, असे स्पष्ट करीत किमान समान कार्यक्रम ठरला तरच आघाडी होईल, असे सूचक विधान वंचित बहुजन आघाडीचे नेते व माजी खासदार एड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे केले.
बुधवारी ते नागपुरात पत्रकार परिषदेत बोलत होते. महाविकास आघाडीसोबत चर्चा वाटपावर सध्या कुठलीही चर्चा झालेली नाही. किंवा आमच्याकडून सुद्धा कुठल्याही जागेची मागणी करण्यात आलेली नाही. चर्चा होत नव्हती म्हणून १२ जागांचा मुद्दा छेडण्यात आला होता, असेही एड. प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले.
एड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, आघाडीसाठी कॉमन मिनिमम प्रोग्राम व कॉमन अंडरस्टँडिंग आवश्यक आहे. लोकशाही वाचवण्यासाठी १९७७ मध्ये असेच सर्व पक्ष एकत्र आले. सत्ताही आली. त्यानंतर कॉमन मिनिमम प्रोग्राम ठरवण्यात आला. त्यातून अनेक पक्ष फुटले. त्याची पुनरावृत्ती होऊ नये. म्हणून आम्ही खबरदारी घेतोय. कॉमन मिनिमम प्रोग्राम काय असेल हे ठरायला हवे. यासाठी आम्ही ३१ विषय आघाडीकडे सादर केले आहेत. त्यावर चर्चा होणार आहे. यावर चर्चा होऊन निर्णय होईल. त्यानंतरच जागा वाटपावर चर्चा होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. पत्रपरिषदेला वंचितचे उपाध्यक्ष धैर्यवर्धन फुंडकर व पूर्व विदर्भ अध्यक्ष माजी मंत्री रमेश गजबे उपस्थित होते.
शरद पवारांचे केवळ चिन्ह गेले लोकं त्यांच्यासोबतच
शरद पवार यांच्या पक्षाचे केवळ चिन्ह गेले, शरद पवार आहे तिथेच आहेत. नागरिकांना सर्व समजते. त्यामुळे लोक (मास) त्यांच्यासोबत आहे, असेही एड. आंबेडकर यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.