प्रकाश आंबेडकरांनी नागपुरात अरविंद बनसोडच्या कुटुंबियांची घेतली भेट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2020 02:55 PM2020-06-18T14:55:33+5:302020-06-18T15:49:29+5:30
अरविंद बनसोड यांची हत्या २७ मे रोजी नागपूरमध्ये करण्यात आली होती. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी अरविंदच्या कुटुंबीयांची आणि वकिलांची भेट घेऊन चर्चा केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: अरविंद बनसोड हत्याप्रकरणी गुरुवारी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. शिवाय आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी, यासाठी वकिलांशीही भेटून चर्चा केली.
अरविंद बनसोड यांची हत्या २७ मे रोजी नागपूरमध्ये करण्यात आली होती. या प्रकरणात आरोपींना पाठीशी घालत असल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला होता. तसेच पोलिसांची भूमिकाही संशयास्पद होती. राज्यभर गाजलेल्या या हत्या प्रकरणात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आवाज उठविला. राज्यभर निषेध करण्यात आले. सरकारला इशारा देण्यात आल्यानंतर या प्रकरणात कारवाई करीत अटकसत्र सुरू करण्यात आले. गुरुवारी आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता यावेळी अरविंद बनसोडचे कुटुंब या ठिकाणी उपस्थित होते. प्रकाश आंबेडकर यांनी न्यायालयाच्या आवारातच अरविंदच्या कुटुंबीयांची आणि वकिलांची भेट घेऊन चर्चा केली. आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी यासाठी काय प्रयत्न करता येतील, ते केले जातील असे आश्वासन प्रकाश आंबेडकर यांनी दिले.
राज्यात मागासवर्गियांवर हल्ले वाढत असून त्याच्या विरोधात बुधवारी राज्यभर वंचित बहुजन आघाडी तर्फे जिल्हा,तालुका स्तरावर निवेदने देऊन या सरकारचा निषेध करण्यात आला. हे हल्ले थांबले नाही तसेच सर्व प्रकरणात योग्य ती कारवाई झाली नाही तर उग्र आंदोलन करण्याचा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. अशी माहिती वंचितचे राज्य प्रसिद्धी प्रमुख सुरेश नंदिरे यांनी दिली.