video:विधानसभेच्या पत्रकार गॅलरीत प्रकाश पोहरे यांची घोषणाबाजी, सुरक्षा रक्षकांनी घेतले ताब्यात
By कमलेश वानखेडे | Published: December 14, 2023 09:14 PM2023-12-14T21:14:27+5:302023-12-14T21:14:34+5:30
विधानसभा तालिका अध्यक्षांचे कारवाईचे आदेश
नागपूर: संसदेत बुधवारी घडलेल्या घटनेतंर ज्येष्ठ पत्रकार व विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष प्रकाश पोहरे यांनी गुरुवारी रात्री ७.४० च्या सुमारास विधानसभेच्या पत्रकार गॅलरीत येऊन विदर्भाच्या मुद्यावर आमदारांना उद्देशून घोषणाबाजी केली. याकडे लक्ष वेधून भाजपचे आ. अँड आशिष शेलार यांनी ही कसली सुरक्षा, असा सवाल केला. याची गंभीर दखल घेत तालिका अध्यक्ष चेतन तुपे यांनी या प्ररणाची चौकशी करून कारवाईचे आदेश दिले. घोषणाबाजीनंतर लगेच पोहरे सभागृहाबाहेर पडले. तेथे विधिमंडळ सुरक्षा रक्षकांनी त्यांना ताब्यात घेतले.
बुधवारी संसदेच्या प्रेक्षक गॅलरीतून दोन युवकांनी सभागृहात उडी घेतल्याचा प्रकार घडला होता. या पार्श्वभूमीवर नागपुरात सुरु असलेल्या विधिमंडळ अधिवेशनातही कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. प्रेक्षक गॅलरीत बसणाऱ्या प्रत्येकाची योग्य तपासणी करूनच प्रवेश दिला गेला. दिवसभराच्या कामकाजानंतर रात्री मराठा आरक्षणावर चर्चा सुरू असताना ७.४० सुमारास पत्रकार प्रकाश पोहरे पत्रकार गॅलरीत येऊन बसले. काही वेळातच ते उभे राहिले व सभागृहात बसलेल्या आमदारांना उद्देशून विदर्भात अधिवेशन होत असल्याचे सांगत विदर्भाच्या प्रश्नांवर बोलणार की नाही, असे मोठमठ्याने विचारू लागले.
विदर्भात अधिवेशन कशासाठी घेता, असेही ते आमदारांना ओरडून म्हणाले. यामुळे सभागृहाच्या कामकाजात अडथळा निर्माण झाला. आमदारांनी यावर आक्षेप घेतला. भाजपचे मुख्य प्रतोद आ. ॲड. आशिष शेलार यांनी ही कसली सुरक्षा, असा सवाल केला. काल संसदेत घडलेल्या घटनेनंतरही विधानसभेच्या पत्रकार गँलरीत कोणीतरी येतो, अध्यक्षांकडे हातवारे करून घोषणाबाजी करतो, कोण आहे ही व्यक्ती, त्यांना प्रवेश कसा मिळाला, विधानसभेची सुरक्षा कशी काय भेदली, असे प्रश्न उपस्थितीत करुन या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली. तालिका अध्यक्ष चेतन तुपे यांनी ती मान्य करीत चौकशीचे आदेश दिले. घोषणाबाजीनंतर पोहरे सभागृहारे पडले असताना सुरक्षारक्षकांनी त्यांना ताब्यात घेतले.