प्रणव मुखर्जी हे सर्व देशाचे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2018 10:35 PM2018-07-07T22:35:24+5:302018-07-07T22:36:40+5:30
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष वर्गाला माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना का बोलविले यासंदर्भात सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनीच स्पष्टोक्ती केली. प्रणव मुखर्जी हे राजकीय पक्षात होते तेव्हा त्यांचे होते. मात्र ते ज्यावेळी राष्ट्रपती झाले तेव्हा ते संपूर्ण देशाचे झाले. आपल्या देशात आत्मियतेचा भाव असून त्यातूनच संघाने त्यांना निमंत्रित केले. असे करताना संघालादेखील संकोच वाटला नाही व निमंत्रण स्वीकारताना त्यांनादेखील संकोच वाटला नाही, या शब्दांत डॉ.भागवत यांनी संघाची भूमिका मांडली. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे स्व. दत्ताजी डिडोळकर यांच्या जीवनावर आधारीत ‘आधारवड’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष वर्गाला माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना का बोलविले यासंदर्भात सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनीच स्पष्टोक्ती केली. प्रणव मुखर्जी हे राजकीय पक्षात होते तेव्हा त्यांचे होते. मात्र ते ज्यावेळी राष्ट्रपती झाले तेव्हा ते संपूर्ण देशाचे झाले. आपल्या देशात आत्मियतेचा भाव असून त्यातूनच संघाने त्यांना निमंत्रित केले. असे करताना संघालादेखील संकोच वाटला नाही व निमंत्रण स्वीकारताना त्यांनादेखील संकोच वाटला नाही, या शब्दांत डॉ.भागवत यांनी संघाची भूमिका मांडली. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे स्व. दत्ताजी डिडोळकर यांच्या जीवनावर आधारीत ‘आधारवड’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते.
डॉ.वसंतराव देशपांडे सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी, ‘अभाविप’चे राष्ट्रीय संघटनमंत्री सुनील आंबेकर, विदर्भ प्रदेशमंत्री विक्रमजित कलाने, प्रदेश अध्यक्ष डॉ.चंद्रकांत रागीट प्रामुख्याने उपस्थित होते. देशातील सर्व लोक एका सूत्राने बांधले गेले आहेत. विविध पक्ष, संघटना यात असताना त्यांना वेगळ्या भूमिकेत शिरावे लागते. मात्र सर्व जण एकच असून आत्मियतेचा भाव सर्वांना एकत्र करतो. आपल्या देशातील तरुणपिढीसमोर चांगली चरित्रे येणे आवश्यक आहे. केवळ महापुरुषांची जयंती, पुण्यतिथी साजरी करण्यात धन्यता मानू नये तर त्यांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे, असे प्रतिपादन डॉ.भागवत यांनी केले. नितीन गडकरी यांनी दत्ताजी डिडोळकरांसोबत केलेल्या कामांच्या आठवणींना उजाळा दिला. डिडोळकर यांनी विद्यापीठाच्या राजकारणात असताना मौलिक मार्गदर्शन केले होते. ते अनेक कर्जदारांची ‘गॅरंटी’ घेत असत व त्यांच्याच प्रेरणेतून मीदेखील तसेच करत आहे. जबाबदारी, संंवेदनशीलता, देशकार्य हे केवळ भाषणाचे विषय नाही, तर तसे जगण्याची प्रेरणा डिडोळकरांनी दिली, असे गडकरी म्हणाले.सुनील आंबेकर यांनीही दत्ताजींच्या आठवणींना उजाळा दिला. चंद्रकांत रागीट यांनी प्रास्ताविक केले. मयुरी पंचबुद्धे हिने संचालन केले तर विक्रमजित कलाने यांनी आभार मानले.
राष्ट्रीय अस्मितेचे प्रतिक उभारायला रोखू शकत नाही
यावेळी डॉ.भागवत यांनी दत्ताजी डिडोळकर यांनी कन्याकुमारी येथे केलेल्या मौलिक कार्यावर प्रकाश टाकला. स्वामी विवेकानंदांच्या स्पर्शाने पवित्र झालेल्या शिळेवर त्यांचे स्मारक उभारण्यासाठी भूमिपूजन करण्यात आले. मात्र काही धर्माच्या लोकांनी तेथील दगड उखडून फेकला. मात्र दत्ताजींनी प्रतिकूल परिस्थिती असतानादेखील केरळमधून तामिळनाडूत काही परिवारांना आणून वसविले व तेथील अतिक्रमण काढले. राष्ट्रीय अस्मितेची प्रतिके उभारण्यापासून कुणीच रोखू शकणार नाही, असे यावेळी डॉ.भागवत म्हणाले.
तेव्हापासून ‘नाटके’ बंद केली
‘अभाविप’मध्ये काम करताना अतिशय प्रतिकूल परिस्थिती होती. मात्र दत्ताजी नेहमी पाठीशी उभे राहत. आम्ही शहरात नाटके आयोजित करण्यास सुरुवात केली. मात्र ज्यादिवशी नाटकाचा शो होता, त्याच दिवशी इंदिरा गांधी यांना अटक झाली. त्यामुळे आता कलाकारांना पैसे कसे द्यायचे हा प्रश्न होता. दत्ताजींनी नाराजी व्यक्त केली, मात्र पैशांची मदत केली. मीदेखील हातातील सोन्याची अंगठी विकली व त्यानंतर थेट लग्नानंतरच अंगठी घातली. तेव्हापासून नाटके बंदच केली, असे गडकरी यांनी सांगितले.