प्रशांत किशोर २० रोजी करणार विदर्भवादी नेत्यांशी चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2022 08:38 PM2022-09-16T20:38:09+5:302022-09-16T20:38:38+5:30
Nagpur News येत्या २० आणि २८ सप्टेंबरला प्रशांत किशोर हे नागपुरात येत आहेत. २० सप्टेंबरला त्यांची विदर्भातील नेत्यांसोबत बैठक होणार आहे.
नागपूर : गेल्या अनेक वर्षांपासून वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसाठी आंदोलन केलं जात आहे. मात्र, मागणी मान्य होत नाही. उलट विदर्भाचे आंदोलन आता कमजोर पडले आहे. त्यामुळे या आंदोलनाला पुन्हा गती देण्यासाठी प्रशांत किशोर यांची मदत घेतली जाणार आहे. येत्या २० आणि २८ सप्टेंबरला प्रशांत किशोर हे नागपुरात येत आहेत.
२० सप्टेंबरला त्यांची विदर्भातील नेत्यांसोबत बैठक होणार आहे. या बैठकीत येथील नेत्यांमध्ये स्वतंत्र विदर्भाबाबत इच्छाशक्ती जागृत व्हावी, यासाठी रणनीती आखण्यात येणार आहे. तसेच तेलंगणा, छत्तीसगड यासारखी राज्ये झपाट्याने प्रगतीकडे वाटचाल करत आहेत. विकासासाठी लहान राज्य चांगले मानले गेले आहेत. त्यामुळे विदर्भाचा विकास व्हावा आणि त्यासाठी स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण झाले पाहिजे, या मुद्द्यावर भर दिला जाईल. त्यानंतर २८ सप्टेंबरला जाहीर कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम कुठे होईल, हे २० सप्टेंबरच्या बैठकीत ठरेल.