प्रशांत किशोर आखणार विदर्भ चळवळीची रणनिती; २८ सप्टेंबरला नागपुरात भूमिका जाहीर करणार
By कमलेश वानखेडे | Published: September 15, 2022 05:15 PM2022-09-15T17:15:36+5:302022-09-15T17:31:27+5:30
२८ सप्टेंबरला नागपूर कराराला ७० वे वर्षे सुरू होत आहे. हे निमित्त साधून याच दिवशी प्रशांत नागपुरात विदर्भवाद्यांशी चर्चा करणार आहेत.
नागपूर : वेगळ्या विदर्भाच्या चळवळीला बळ देण्यासाठी आता राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर हे रणनिती आखणार आहेत. येत्या २८ सप्टेंबरला ते नागपुरात येत असून, विदर्भवादी नेत्यांसोबत बैठक घेत स्वतंत्र विदर्भाबाबत ते आपली भूमिका जाहीर करणार आहेत.
वेगळ्या विदर्भाची मागणी जुनी आहे. मात्र, ही चळवळ अनेकांनी मध्येच सोडल्याची उदाहरणे आहेत. विदर्भ राज्य आंदोलन समिती सातत्याने या मुद्द्यावर आंदोलने करीत आहे. काही दिवसांपूर्वी माजी आमदार आशिष देशमुख यांनी प्रशांत किशोर यांची भेट घेत विदर्भाच्या लढ्याला सहकार्य करण्याची विनंती केली होती. त्यांच्या निमंत्रणावरूनच किशोर हे येत आहेत. २८ सप्टेंबरला नागपूर कराराला ७० वे वर्षे सुरू होत आहे. हे निमित्त साधून याच दिवशी प्रशांत नागपुरात विदर्भवाद्यांशी चर्चा करणार असून, याच बैठकीत आंदोलनाची दिशाही ठरणार आहे.
विदर्भ सर्वेक्षणाचा अहवाल मांडणार
- प्रशांत किशोर यांच्या आयपॅक या संस्थेतर्फे गेली दोन महिने विदर्भातील एकूणच परिस्थिचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. या सर्वेक्षणात समोर आलेले तथ्य ते या दौऱ्यात विदर्भवादी नेत्यांच्या समोर मांडणार आहेत. त्यांचा हा अहवाल विदर्भाच्या चळवळीसाठी पोषक असे दस्तावेज ठरेल, असा दावा केला जात आहे.