कारागृहात लष्कर, सिमीच्या दहशतवाद्यांकडून विषप्रयोगाचा प्रयत्न, प्रशांत राही यांचा सनसनाटी आरोप

By नरेश डोंगरे | Published: March 7, 2024 11:45 PM2024-03-07T23:45:10+5:302024-03-07T23:45:26+5:30

प्रशांत राही हे मुळचे श्रीरामपूर, अहमदनगर येथील रहिवासी असून ते आयआयटी बनारसचे विद्यार्थी आहेत.

Prashant Rahi's Sensational Allegation of Attempted Poisoning by Army, Simi Terrorists in Jail | कारागृहात लष्कर, सिमीच्या दहशतवाद्यांकडून विषप्रयोगाचा प्रयत्न, प्रशांत राही यांचा सनसनाटी आरोप

कारागृहात लष्कर, सिमीच्या दहशतवाद्यांकडून विषप्रयोगाचा प्रयत्न, प्रशांत राही यांचा सनसनाटी आरोप

नागपूर : कारागृहात असताना लष्कर ए तोयबा आणि सिमीच्या दहशतावाद्यांनी आपल्यावर विषप्रयोग केला, असा सनसनाटी आरोप प्रशांत राही नारायण सांगलीकर (६०) यांनी आज केला. दहशतवादी कृत्याचा कट रचणे, दहशतवादी संघटनेला सहकार्य करणे असे आरोप लावून राही यांना कथित नक्षल समर्थक प्रा. जी. एन. साईबाबा यांच्यासोबत कारागृहात डांबण्यात आले होते. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी साईबाबा, राही तसेच महेश तिरकी आणि हेम केशव मिश्रा यांची निर्दोष सुटका केली. त्यानंतर कारागृहांत बंदिस्त असलेल्या या सर्वांची मुक्तता करण्यात आली. यानंतर निवडक पत्रकारांनी प्रशांत राही यांना गाठून बोलते केले असता त्यांनी अनेक खळबळजनक खुलासे केले.

प्रशांत राही हे मुळचे श्रीरामपूर, अहमदनगर येथील रहिवासी असून ते आयआयटी बनारसचे विद्यार्थी आहेत. ते म्हणाले, देशातील एका प्रमुख इंग्रजी दैनिकात पत्रकार म्हणून काही वर्षे नोकरी केल्यानंतर उत्तराखंडच्या चळवळीत उतरलो. पत्रकारिता आणि सामाजिक चळवळीत कार्यरत असताना आपण देशातील विविध सामाजिक संघटनांच्या तसेच विचारवंत, लेखकांच्या संपर्कात आलो. २००७ मध्ये माोवादी समर्थक असल्यावरून आपल्यावर केस दाखल झाली आणि त्यातून बाहेर आल्यानंतर आपण प्रकाशझोतात आलो. प्रा. साईबाबांचा साथीदार असल्याच्या आरोपावरून आपल्याला १ सप्टेंबर २०१३ ला रायपूर (छत्तीसगड) येथे पोलिसांनी अटक केली.

विशेष म्हणजे, मतभिन्नता असल्यामुळे आपण खूप महिन्यांपूर्वीच साईबाबांशी संपर्क तोडला होता. त्यांच्याशी कसलाही संपर्क नसताना अटक करून पोलिसांनी दहशतवादी संघटनेला मदत केल्याचा आरोप लावून २०१७ ला अमरावती कारागृहात आणले. तेथे अंडासेलमध्ये डांबण्यात आले. बाजुलाच ऑर्थर रोड कारागृहातून आणलेले लष्कर ए तोयबा, सिमीचे दहशतवादी होते. मुंबईतील काही भाईदेखिल होते. कारागृहातील अधिकाऱ्यांकडून अडचण होऊ नये, तेथे पाहिजे त्या सोयी-सुविधा मिळाव्या म्हणून ते अधिकाऱ्यांची चापलुसी करीत होते. 

आपण मात्र अन्याय अत्याचार झालेल्यांना दिलासा देण्यासाठी, गुन्हेगारीचे मुळ जाणून घेण्यासाठी प्रयत्न करीत होतो. कारागृहातील गैरप्रकार आणि अत्याचाराविरुद्ध आवाज उठवित होतो. त्यामुळे लष्कर आणि सिमीच्या दहशतवाद्यांकडून प्रारंभी आपले ब्रेन वॉश करण्याचे प्रयत्न झाले. त्यांनी वेगवेगळे आमिष दाखविले. त्याला दाद देत नसल्यामुळे त्यांनी आपल्यावर जेवणातून विषप्रयोग करण्याचा प्रयत्न केला. हे सर्व दहशतवादी खुषमस्करे आहेत आणि एका षडयंत्रानुसार त्यांनी आपल्याला तेथे संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप प्रशांत यांनी केला.

'त्या' विषारी बिया कशाच्या होत्या?
कारागृहात मुंबई, पुण्यातून 'पनिशमेंट'च्या धर्तिवर पाठविलेले काही अधिकारी, तिकडून शिफ्ट झालेले दहशतवादी आणि गँगस्टर हे वेगवेगळ्या पदार्थाचा वापर करतात. रेसकोर्सवर नेण्यापूर्वी घोड्यांना ओकारी यावी, रिकामे पोट होऊन ते प्रचंड उत्तेजीत व्हावे यासाठी काही बिया खाऊ घालण्यात येतात. त्या विषारी असतात. १० जुलै २०२२ ते फेब्रुवारी २०२३ या कालावधीत याच विषारी बिया आपल्याला जेवणातून खाऊ घालण्याचा प्रयत्न झाल्याचे प्रशांत म्हणाले. आपल्याला मारण्यासाठीच हे करकारस्थान होते, असा आरोपही त्यांनी केला.

कुठे गेली फॅक्ट फाईंडिंग कमिटी ?
नक्षलग्रस्त भागात दलित आदिवासींवर होणाऱ्या अन्याय, अत्याचारामागचे सत्य शोधण्यासाठी एक फॅक्ट फाईंडिंग कमिटी नेमण्यात आली. मात्र, या कमिटीने त्यांचा तयार केलेला अहवाल सादर केल्यास देशभर खळबळ निर्माण होईल, याची कल्पना आल्यामुळे सरकारने ही कमिटीच गायब केल्याचा आरोप प्रशांत राही यांनी केला. त्यांनी भिमा कोरेगाव प्रकरणाचाही यावेळी उल्लेख केला.

Web Title: Prashant Rahi's Sensational Allegation of Attempted Poisoning by Army, Simi Terrorists in Jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर