नागपूरचा महाठग प्रशांत वासनकरची चार कोटींची मालमत्ता जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 01:07 AM2018-05-12T01:07:53+5:302018-05-12T01:08:04+5:30

हजारो गुंतवणूकदारांच्या आयुष्याची कमाई गिळंकृत करून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आणणारा महाठग प्रशांत वासनकर आणि त्याच्या नातेवाईकांच्या नावे असलेली सुमारे ४ कोटींची जमीन गुन्हे शाखेच्या आर्थिक विभागाने जप्त केली.

Prashant Wasankar's assets worth Rs 4 crore were seized from Nagpur | नागपूरचा महाठग प्रशांत वासनकरची चार कोटींची मालमत्ता जप्त

नागपूरचा महाठग प्रशांत वासनकरची चार कोटींची मालमत्ता जप्त

Next
ठळक मुद्देचिंचभुवनमधील जमीन : आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हजारो गुंतवणूकदारांच्या आयुष्याची कमाई गिळंकृत करून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आणणारा महाठग प्रशांत वासनकर आणि त्याच्या नातेवाईकांच्या नावे असलेली सुमारे ४ कोटींची जमीन गुन्हे शाखेच्या आर्थिक विभागाने जप्त केली.
महाठग प्रशांतची आई सरला वासनकर, तसेच कौस्तुभ शास्त्री आणि राजेश तुरकर यांच्या नावे वर्धा मार्गावरील चिंचभुवन परिसरात असलेल्या या जमिनीच्या जप्तीसंदर्भाने सहा महिन्यांपूर्वी अधिसूचना काढण्यात आली होती.
महाठग वासनकर याने वासनकर वेल्थ मॅनेजमेंटच्या नावाखाली अल्पावधीत दामदुप्पट व्याज देण्याचे आमिष दाखवून हजारो ठेवीदारांकडून शेकडो कोटींच्या ठेवी गोळा केल्या होत्या. ही शेकडो कोटींची रोकड वासनकर आणि त्याच्या नातेवाईकांनी हडपली. या प्रकरणात तक्रार दाखल झाल्यानंतर २००२ मध्ये अंबाझरी ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. मात्र, फसवणुकीची रक्कम कोट्यवधीत असल्याने प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी प्रशांत वासनकर, त्याची पत्नी, त्याचा भाऊ विनय आणि प्रशांतचा मेव्हणा अभिजित चौधरीसह अनेकांवर गुन्हे दाखल केले. काही जणांना त्यात जामीन मिळाला तर प्रशांत, विनय आणि अभिजित अद्यापही कारागृहात आहे.
पोलिसांनी या प्रकरणात महाराष्ट्र गुंतवणूकदार हित संरक्षण अधिनियम (एमपीडीआई) अन्वये गुन्हे दाखल केले. याच अधिनियमानुसार जमीन जप्तीची कारवाई करण्यात आली.
गुंतवणूकदारांना परतावा मिळणार ?
गुन्हे शाखेच्या आर्थिक विभागाने महाठग वासनकरशी संबंधित आठ मालमत्तांमधून २० ते २५ कोटी रुपयांची मालमत्ता आतापर्यंत जप्त केली. त्यातील ४ कोटी, ४४ लाखांच्या मालमत्तेची विक्री करण्यात आली. यातून गुंतवणूकदारांची रक्कम परत केली जाणार आहे. लाखो रुपये गुंतवणाऱ्यांना पूर्ण परतावा मिळणार नसला तरी थोडीफार रक्कम मिळेल, हे निश्चित झाल्याने गुंतवणूकदारांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, सहआयुक्त शिवाजीराव बोडखे, गुन्हे आर्थिक विभागाच्या पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय निंबाळकर, विधी अधिकारी स्वप्निल अलोणी तसेच पोलीस कर्मचारी अनिल त्रिवेदी आणि सीमा टेकाम यांनी ही कामगिरी बजावली.

Web Title: Prashant Wasankar's assets worth Rs 4 crore were seized from Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.