प्रतापनगरात दोन गटात जोरदार हाणामारी; गाड्यांची तोडफोड
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2019 05:43 AM2019-12-11T05:43:14+5:302019-12-11T05:43:31+5:30
मंगळवारी रात्री ११ च्या सुमारास ही घटना घडली.
नागपूर : शहरातील वाहतूक व्यावसायिक संजू ऊर्फ संजय बागडी यांनी एका कारची तोडफोड केली तर त्या वाहनांमधील आरोपींनी बागडी यांची कार पेटवून दिली. या दोन्ही घटनांमुळे तणाव निर्माण झाला होता. अशात घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांसोबत बागडींनी वाद घातला. त्यामुळे प्रकरणाला कलाटणी मिळाली. स्नेहनगरमध्ये मंगळवारी रात्री ११ च्या सुमारास ही घटना घडली. तत्पूर्वी सुभाषनगरमध्ये युवकांच्या दोन गटात जोरदार हाणामारी झाली. या दोन घटनांमुळे प्रतापनगरातील वातावरण मंगळवारी रात्री कमालीचे गरम झाले होते.
संजय बागडी यांचे टूर्स अॅन्ड ट्रॅव्हल्स आहे. गणेशपेठ बसस्थानकाजवळ त्यांचे कार्यालय असून, अंबाझरीत निवासस्थान असल्याचे पोलीस सांगतात. पोलिसांच्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री ११ च्या सुमारास बागडींचा स्नेहनगरमध्ये काही जणांसोबत वाद झाला. त्यातून बागडी यांनी वाद घालणारांच्या कारची तोडफोड केली. परिणामी त्या कारमधील दोघांनी बागडी यांच्या वॅगनआर कारला पेटवून दिले. या घटनेमुळे परिसरात वातावरण गरम झाले.
एकाने नियंत्रण कक्षाला तर नियंत्रण कक्षाने प्रतापनगर पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार, प्रतापनगर पोलिसांचे पथक तेथे पोहचले. यावेळी तेथे बघ्यांची मोठी गर्दी होती. काय झाले, अशी विचारणा करणाºया पोलिसांसोबत कारमालक बागडी यांनी माहिती देण्याऐवजी वाद घातल्याचा आरोप आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, वाद घालणाºया बागडी यांना नीट उभेही राहता येत नव्हते. पोलिसांनी बागडी यांना पोलीस ठाणे आणि नंतर मेडिकलमध्ये नेले. तेथे त्यांची रात्री १२. ३० वाजतापर्यंत वैद्यकीय तपासणी सुरू होती.
सुभाषनगरात प्रचंड तणाव
रात्री १०. ३० च्या सुमारास दारूच्या नशेत दोन टोळके एकमेकांसोबत भिडले. त्यांच्यात जोरदार हाणामारी झाल्याने प्रचंड तणाव निर्माण झाला. मिळालेल्या माहितीवरून प्रतापनगर पोलिसांचे पथक तेथे पोहचले. दोन्ही गटातील हाणामारी करणाºयांना त्यांनी पोलीस ठाण्यात नेले. त्यामुळे पोलीस ठाण्यात दोन्हीकडील मंडळी मोठ्या संख्येत पोहचली. त्यांच्यातील काही जण आपसी समेटाची भाषा वापरत होते तर काही जण आरोप-प्रत्यारोप करीत होते. त्यामुळे मध्यरात्रीपर्यंत पोलीस ठाण्याच्या बाजूचे वातावरण गरम होते. हाणामारी करणारांपैकी काही जण अल्पवयीन होते. त्यामुळे काय कारवाई करावी, यावर विचार सुरू असल्याचे प्रतापनगर पोलीस सांगत होते.