पंतप्रधान मोदींच्या दबावाखाली संघ - प्रवीण तोगडिया; लोकसभेत भाजपा-काँग्रेसला पर्याय उभा करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2018 03:05 AM2018-10-08T03:05:52+5:302018-10-08T03:06:22+5:30
आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनी रविवारी संघभूमीत येऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. संघ आता नरेंद्र मोदी यांच्या दबावात कार्य करत आहे.
नागपूर : आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनी रविवारी संघभूमीत येऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. संघ आता नरेंद्र मोदी यांच्या दबावात कार्य करत आहे. त्यामुळेच राममंदिराबाबत कायद्यासाठी कुणीही पाऊल उचलले नाही. माझ्यावरदेखील दबाव आणण्याचा प्रयत्न करण्यात आला, असा आरोप त्यांनी केला. तसेच पुढील लोकसभा निवडणुकांमध्ये भाजप व कॉंग्रेसला पर्याय उभा करणार असल्याचा दावादेखील त्यांनी केला.
आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेतर्फे २१ आॅक्टोबरपासून लखनौ ते अयोध्या शांतीपूर्ण यात्रा काढण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी ते आले होते. राममंदिर उभारण्यासाठी संसदेत कायदा व्हावा, अशी संघाची जुनी भूमिका होती. राममंदिर निर्मितीत मोठा अडथळा खुद्द पंतप्रधान हेच आहेत, असा आरोप तोगडिया यांनी केला.
शिवसेनेकडून हिंदूंना बऱ्याच अपेक्षा
भाजपने नांगी टाकली असताना शिवसेनेकडून हिंदू लोकांना बºयाच अपेक्षा आहेत. बाळासाहेब ठाकरे यांनी दाखविलेल्या दिशेने शिवसेनेने चालावे. राममंदिरासाठी शिवसेनेने ठोस भूमिका घ्यावी व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अयोध्येकडे कूच करावे, आम्ही त्यांचे स्वागत करुन पूर्ण समर्थन देऊ, असेही डॉ. तोगडिया म्हणाले.