जि.प.त जाणवला पीआरसीचा तणाव

By admin | Published: September 30, 2015 06:51 AM2015-09-30T06:51:36+5:302015-09-30T06:51:36+5:30

आठ वर्षानंतर जिल्हा परिषदेच्या दौऱ्यावर आलेल्या पंचायत राज समितीमुळे संपूर्ण जिल्हा परिषदेच्या वातावरणात

PRC stressed in ZP | जि.प.त जाणवला पीआरसीचा तणाव

जि.प.त जाणवला पीआरसीचा तणाव

Next

नागपूर : आठ वर्षानंतर जिल्हा परिषदेच्या दौऱ्यावर आलेल्या पंचायत राज समितीमुळे संपूर्ण जिल्हा परिषदेच्या वातावरणात मंगळवारी तणाव जाणवला. अधिकाऱ्यांच्या कामाचे निरीक्षण होणार असल्याने अधिकाऱ्यांवर तणाव दिसून आला. पदाधिकाऱ्यांच्या कामकाजाची केवळ वर्षपूर्ती झाल्यामुळे त्यांचीही पळापळ होताना दिसली. गाऱ्हाणे मांडण्याची संधी न मिळाल्याने सदस्यांमध्ये नाराजी दिसून आली. समिती पुढचे दोन दिवस जिल्ह्यात आहे. पहिल्या दिवसाचे कामकाज लक्षात घेता, पुढचे दोन दिवस अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांसाठी डोईजड जाणार असल्याचे दिसते आहे.
पंचायत राज समितीने सकाळी जिल्ह्यातील आमदारांची आणि जि.प. च्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान पदाधिकाऱ्यांनी काही सूचना समितीला केल्या. यात सदस्यांचा निधी वाढवून देण्यासंदर्भात मागणी करण्यात आली. अध्यक्षांचे अधिकार वाढवावे, कृषी विभागाच्या योजना जि.प. च्या माध्यमातून राबविण्यात याव्यात, अशा सूचना पदाधिकाऱ्यांनी समितीला केल्या. सभागृहात समितीचे कामकाज दिवसभर सुरू असल्याने, अध्यक्ष व सभापती सुद्धा पूर्णवेळ हजर होते. त्यांचीही सतत पळापळ होत होती. समितीत विविध पक्षाचे आमदार असल्याने, काही पदाधिकारी सेवेत व्यस्त होते.
या सर्वात जि.प. सदस्यांची चांगलीच गोची झाली. समितीच्या दौऱ्यात सदस्याच्या भेटीचे नियोजन नसल्याने, सदस्यांना आपले गाऱ्हाणे मांडता आले नाही. त्यामुळे त्यांच्यात नाराजी होती. तरीही काही सदस्यांनी पदाधिकाऱ्यांसोबत जाऊन समितीपुढे आपले मत मांडले. विरोधी पक्षाच्या सदस्यांनी समितीला सभागृहातच गाठून तक्रारीचे निवेदन दिले. (प्रतिनिधी)

जि.प. मधील गैरव्यवहाराची चौकशी करावी
४कृषी विभागांतर्गत जि.प. सेस फंडातून क्रेट खरेदीसाठी निधी उपलब्ध होता. त्यात शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदानावर क्रेट देण्याचे ठरविले होते. मात्र मर्जीचा ठेकेदार न मिळाल्याने कृषी अधिकाऱ्यांनी तीन वेळा निविदा काढल्या. क्रेट खरेदीसाठी अधिकाऱ्यांनी नियम धाब्यावर बसविले. ताडपत्री खरेदीतही मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाला. शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळाले नाही, दुष्काळग्रस्त टंचाई आराखड्यातील निधी मंजूर होऊनही विंधन विहिरी झाल्या नाही. या तक्रारीचे निवेदन विरोधी पक्ष नेते मनोहर कुंभारे यांच्या नेतृत्वात उपासराव भुते, मनोज तितरमारे, शिव यादव, ज्ञानेश्वर कंभाले यांनी समितीला दिले. याप्रकरणाची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी केली.
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची निदर्शने
४जि.प.च्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती वेतनापासून वंचित ठेवण्यात येत आहे. कर्मचाऱ्यांचे आठ ते दहा वर्षांपासून पेन्शन मंजुरी व भूगतान प्रलंबित आहे. नियमित पेन्शन मिळत नसल्याने जि.प. पेन्शनर महासंघाने जि.प.समोर नारेबाजी केली. त्यामुळे समितीचे अध्यक्ष संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी स्वत: त्यांची भेट घेतली. यावेळी महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र गंगोत्री, एन. एल. सावरकर, के.जी. दाढे यांच्यासह मोठ्या संख्येने निवृत्त कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: PRC stressed in ZP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.