महात्मा गांधी, पंतप्रधान मोदींचा आधार घेत भाजपकडून निवडणुकीचा ‘प्री-प्रचार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2022 10:57 AM2022-09-17T10:57:37+5:302022-09-17T10:57:56+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस, तसेच महात्मा गांधी जयंतीनिमित्त भाजपतर्फे सर्व प्रभागांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे

'Pre-campaign' of elections by BJP, taking the name support of Mahatma Gandhi, PM Narendra Modi | महात्मा गांधी, पंतप्रधान मोदींचा आधार घेत भाजपकडून निवडणुकीचा ‘प्री-प्रचार’

महात्मा गांधी, पंतप्रधान मोदींचा आधार घेत भाजपकडून निवडणुकीचा ‘प्री-प्रचार’

googlenewsNext

नागपूर : अद्याप महानगरपालिका निवडणुकांबाबत अनिश्चितता असली तरी भाजपतर्फे जनतेमध्ये जाऊन ‘गुडविल’ तयार करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस, तसेच महात्मा गांधी जयंतीनिमित्त भाजपतर्फे सर्व प्रभागांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या पंधरवड्यात गृहसंपर्क व समाजमाध्यमांतून संपर्क साधत जनतेत ‘मोदी महिमा’ मांडण्यावर भर देण्यात येणार असून, निवडणुका घोषित होण्याच्या अगोदरचाच प्रचार करण्याचा या माध्यमातून प्रयत्न होणार आहे.

१७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत भाजपकडून हा पंधरवडा राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत शहरातील सर्व मंडळांसह सर्व आघाड्यांतर्फे विविध कार्यक्रम व उपक्रमांचे आयोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय केंद्र शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवून त्यांचा प्रचार- प्रसार करत जनतेत जाणे, रक्तदान- आरोग्य शिबिरांचे आयोजन करणे इत्यादींबाबतदेखील सूचना देण्यात आली आहे. सोबतच महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त स्वच्छता मोहीम, पर्यावरण संवर्धनासाठी जनजागृती मोहीम व रॅलीचे आयोजन व संबंधित योजनांचा प्रचार- प्रसार करण्यासदेखील सांगण्यात आले आहे. विविध पदाधिकाऱ्यांना याबाबत जबाबदाऱ्यांचे वाटप करून देण्यात आले आहे. विशेष म्हणजे सर्व पदाधिकाऱ्यांना खादीचे कपडे घेऊन घालणे अनिवार्य करण्यात आले आहे.

मनपातही पंतप्रधानांचे नाव घेतच जनतेशी ‘कनेक्ट’

शहरातील रस्ते, गडर, तसेच इतर समस्या कायम असून, भाजपच्या माजी नगरसेवकांबाबत अनेक ठिकाणी रोष कायम आहे. अनेक नगरसेवक त्यांच्या कार्यकाळात प्रभागांमध्ये समस्या सोडवायला गेलेदेखील नव्हते. मात्र, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या पंधरवड्यादरम्यान सर्वांनाच जनतेमध्ये जाणे अनिवार्य करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव घेतच जनतेशी ‘कनेक्ट’ साधण्यात येणार आहे.

Web Title: 'Pre-campaign' of elections by BJP, taking the name support of Mahatma Gandhi, PM Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.