पावसाळ्याआधीची खबरदारी; नागपुरातील नद्यांची साफसफाई सुरू
By मंगेश व्यवहारे | Published: May 10, 2023 04:54 PM2023-05-10T16:54:36+5:302023-05-10T16:55:07+5:30
Nagpur News यंदा शहरातील नद्यांच्या स्वच्छतेला उशिराच सुरुवात झाली. नागनदी, पोहरा नदी व पिवळी नदी स्वच्छतेसाठी महापालिकेने १२ भाग केले आहेत.
मंगेश व्यवहारे
नागपूर : यंदा शहरातील नद्यांच्या स्वच्छतेला उशिराच सुरुवात झाली. नागनदी, पोहरा नदी व पिवळी नदी स्वच्छतेसाठी महापालिकेने १२ भाग केले आहेत. त्या १२ पैकी ९ भागात स्वच्छतेच्या कामाला सुरुवात झाली आहे. दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नद्यांच्या स्वच्छतेवरही परिणाम झाला आहे.
२०१३ मध्ये लोकसहभागातून नदी स्वच्छता अभियान सुरू करण्यात आले होते. यंदा महापालिकेचा कारभार प्रशासकाच्या हाती असल्याने नद्या स्वच्छतेची चळवळ होऊ शकली नाही. त्यातच नद्यांच्या स्वच्छतेसाठी उशीरही झाला. नदी स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून दरवर्षी ०.८ ते १.५ लक्ष मेट्रिक टन गाळ काढण्यात येतो. यावर्षी नदी स्वच्छता अभियान अंतर्गत वाढलेली हिरवळ, गवत तसेच गाळ काढून नद्यांची रुंदी व खोली स्वच्छ करून पावसाळी पाणी वाहण्याकरिता सुरळीत प्रवाह करण्यात येईल.
नदी काठावर असलेल्या वस्त्यांत पावसाळ्यात येणाऱ्या पुरापासून सुरक्षा प्रदान होईल. स्वच्छतेदरम्यान नदीमधून काढण्यात येणारा गाळ, माती तशीच पडून राहू नये याबाबत विशेष काळजी घेण्यात येणार आहे. तसेच नदीमधून काढण्यात येणाऱ्या मातीचा उपयोग वृक्ष लागवडीसाठी करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. शहरातून वाहणाऱ्या नाग नदीची लांबी १७.४ किमी, पिवळी नदीची लांबी १६.४ आणि पोहरा नदीची लांबी १३.१२ किमी आहे. १२ भागात स्वच्छता केली जाणार आहे.