पूर्व विदर्भात कमी पावसाचा धानाला फटका; तांदूळ महागला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 11:23 AM2018-03-05T11:23:11+5:302018-03-05T11:23:21+5:30
मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण झाल्यामुळे यावर्षी तांदळाचे भाव प्रति किलो ५ ते ८ रुपयांनी वधारले आहेत.
मोरेश्वर मानापुरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण झाल्यामुळे यावर्षी तांदळाचे भाव प्रति किलो ५ ते ८ रुपयांनी वधारले आहेत. पूर्व विदर्भात कमी पावसाचा धानाला फटका बसल्यामुळे तांदळाच्या भावात निर्माण होणारी तेजीची परंपरा यावर्षी कायम राहिली.
महिनाभरात तांदळाच्या बाजारात तेजी निर्माण झाली आहे. विशेषत: जय श्रीराम आणि चिन्नोर तांदळाच्या भावात मोठी वाढ झाली आहे. दोन महिन्यापूर्वी नवीन तांदूळ बाजारात आले तेव्हा भाव कमी होते. तेव्हापासून आतापर्यंत तब्बल ७ ते ८ रुपये किलोने भाव वधारल्याची माहिती व्यावसायिक रमेश उमाटे यांनी लोकमतशी बोलताना दिली. विदर्भात जय श्रीराम आणि चिन्नोर या तांदळाच्या वाणाला जास्त मागणी आहे. यंदा याच तांदळाच्या उत्पादनाला फटका बसला आहे. सध्या किरकोळ बाजारात दर्जानुसार प्रति किलो ४५ ते ५० रुपये भाव आहेत. तर चिन्नोरचे भाव वधारले असून भाव ५५ ते ६० रुपयांदरम्यान आहेत.
या वाणाच्या धानाचे भाव २,३५० ते २,४५० रुपये क्विंटल आहेत. या तुलनेत कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील धान २,२०० ते २,३०० रुपयांत मिल मालकांना सहजरीत्या उपलब्ध आहेत. यावर्षी तांदळाच्या भाववाढीचा गरीब आणि सामान्यांना फटका बसत आहे.
विदर्भात ५० टक्के कमी उत्पादन
धानाचे पीक नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक होते. दर्जेदार उत्पादनामुळे अन्य राज्याच्या तुलनेत भाव थोडे जास्तच आहेत. पण पाऊस कमी आल्यामुळे ५० टक्के धानाच्या पिकाला फटका बसला. याउलट भरपूर पावसामुळे आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात आणि उत्तर प्रदेशमध्ये धानाचे विक्रमी उत्पादन निघाले आहे. आंध्र प्रदेश आणि कर्नाटक राज्यातून नागपुरात दररोज २५ ट्रकची (५०० टन) आवक आहे. याशिवाय उपरोक्त चारही राज्यातून संपूर्ण देशात तांदळाचा पुरवठा होत आहे. दोन राज्यातून नागपुरात तांदळाची आवक नसती तर यावर्षी गतवर्षीच्या तुलनेत भाव आकाशाला भिडले असते, असे उमाटे यांनी स्पष्ट केले.
तूर डाळ ६० ते ७० रुपये
तूर डाळीतील मंदी गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही राहण्याची शक्यता आहे. यावर्षी तुरीचे नवीन पीक निघाले असून चांगल्या उत्पादनाची शक्यता आहे. सध्या किरकोळमध्ये तूर डाळीचे भाव दर्जानुसार ६० ते ७० रुपये प्रति किलो आहेत. यंदा भाववाढीची शक्यता नाही.