झिका विषाणुमुळे नागपुरात खबरदारीच्या सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:07 AM2021-07-11T04:07:00+5:302021-07-11T04:07:00+5:30
नागपूर : कोरोनाचे संकट कमी होत नाही तोच आता झिका विषाणूचे रुग्ण वाढत असल्याने चिंता वाढली आहे. केरळमधील तिरुवनंतपुरम ...
नागपूर : कोरोनाचे संकट कमी होत नाही तोच आता झिका विषाणूचे रुग्ण वाढत असल्याने चिंता वाढली आहे. केरळमधील तिरुवनंतपुरम जिल्ह्यात १४ रुग्णांना झिका विषाणूची लागण झाल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. गर्भवती महिला आणि गर्भातील बाळाकरिता या विषाणूचा सर्वाधिक धोका असल्याने खबरदारीच्या सूचना जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
केरळमध्ये २४ वर्षीय गर्भवती महिलेला झिका झाल्याचे निदान होत नाही तोच आणखी १३ रुग्णांना याची लागण झाल्याचे समोर आले आहे. गर्भवती महिलेसह सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येते. नागपूर जिल्ह्यातून पर्यटनसाठी केरळमध्ये गेलेल्या प्रवाशांची संख्या कमी असली तरी त्याकडे आरोग्य विभाग आता लक्ष ठेवणार आहे. तज्ज्ञाच्या मते, झिका आणि डेंग्यूचे विषाणू एकच आहेत. त्यामुळे झिकाची लागण होणे शक्य आहे. रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्यांना झिकाचा धोका अधिक असतो. विशेषत: गर्भारपणाच्या काळात आईकडून नवजात बाळाला या झिका विषाणूचा संसर्ग होऊ शकतो. यामध्ये विषाणू बाळाच्या अविकसित मेंदूवर थेट हल्ला करतो. यामुळे जन्माला येणाऱ्या बाळाचे डोके शरीराच्या तुलनेत छोटे असते. या आजाराला ‘मायक्रोसेफली’ म्हटले जाते.
-झिकाचा इतिहास
२०१५ मध्ये जगात आलेल्या झिकाच्या साथीमध्ये एकट्या ब्राझिलमध्ये १७ लाख रुग्णांची नोंद झाली होती. यातील साधारण ३५०० मुलांमध्ये मेंदू लहान असल्याचे निदर्शनास आले होते. जगातील ७० देशात या विषाणूचा प्रादुर्भाव पसरून जवळपास ४० लाख लोकांना याचा संसर्ग झाला होता. हा विषाणू पहिल्यांदा १९४७ मध्ये युगांडाच्या झिका जंगलातील माकडांमध्ये दिसून आला होता.
-अशी होते लागण
एडीस जातीचा डास चावल्यानंतर झिका विषाणूची लागण होते. या डासांची निर्मिती स्वच्छ पाण्यात होते. या डासामुळे डेंग्यू, चिकनगुनिया आणि पिवळा ताप होण्याची देखील शक्यता असते.
-रोगाची लक्षणे
झिका विषाणूचा प्राथमिक लक्षणात, ताप येणे, अंग दुखणे, तसेच अंगावर लाल रंगाचे चट्टे येतात. या दरम्यान प्रचंड डोकेदुखी होते, डोळे लाल होणे, अशक्तपणा आणि थकवा देखील जाणवतो. हा आजार दोन ते सात दिवसात बरा होतो. १० टक्के लोकांना काहीच त्रास होत नाही.
-या व्यक्तींना सर्वाधिक धोका
मधुमेह, यकृत व हृदयविकार असलेल्या रुग्णांना या रोगाचा धोका अधिक असतो. या सोबतच ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे, वयोवृद्ध व्यक्ती, गर्भवती महिला व लहान मुलांना लागण होण्याची जास्त जोखीम असते.
-जन्माला आलेल्या मुलांच्या डोक्यांचा घेर मोजण्याच्या सूचना
झिका विषाणूबाबत आरोग्य विभागाने मागेच मार्गदर्शक तत्वे जारी केली होती. त्यानुसार आता पुन्हा सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांना याबाबत ‘अलर्ट’ राहण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत. यात जन्माला आलेल्या मुलांच्या डोक्यांचा घेर मोजण्याचे निर्देश आहेत. झिका विषाणूचा फैलाव डासांमुळे होतो. यामुळे पाणी जमा होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यावी.
-डॉ. दीपक सेलोकर, जिल्हा आरोग्य अधिकारी नागपूर