पल्स ऑक्सिमीटर वापरताना घ्यायला हवी काळजी : उपकरणाबाबत संभ्रम वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2020 09:05 PM2020-09-29T21:05:16+5:302020-09-29T21:07:07+5:30
कोरोनाचा संसर्ग झपाट्याने पसरत असताना आता घरोघरी ऑक्सिमीटर दिसू लागले आहेत. सुरुवातीला या उपकरणाला गंभीरतेने घेऊन नंतर त्याचा खेळण्यासारखा वापर होत असल्याचे दिसून येत आहे. काही तर हाताच्या पाचही बोटांना ऑक्सिमीटर लावून दिसत असलेल्या वेगवेगळ्या आकड्यांचा फोटो आणि माहिती सोशल मीडियावर व्हायरलही करीत आहे. त्यामुळे ऑक्मिीटरचा वापर नेमका कसा करावा, याबाबत सामान्यांमध्ये संभ्रम पहायला मिळत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाचा संसर्ग झपाट्याने पसरत असताना आता घरोघरी ऑक्सिमीटर दिसू लागले आहेत. सुरुवातीला या उपकरणाला गंभीरतेने घेऊन नंतर त्याचा खेळण्यासारखा वापर होत असल्याचे दिसून येत आहे. काही तर हाताच्या पाचही बोटांना ऑक्सिमीटर लावून दिसत असलेल्या वेगवेगळ्या आकड्यांचा फोटो आणि माहिती सोशल मीडियावर व्हायरलही करीत आहे. त्यामुळे ऑक्मिीटरचा वापर नेमका कसा करावा, याबाबत सामान्यांमध्ये संभ्रम पहायला मिळत आहे.
आपल्या रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण मोजण्यासाठी ऑक्सिमीटरचा उपयोग होतो. कोरोनाबाधित रुग्णांमध्ये फुफ्फुसाला संसर्ग झाल्याने श्वास घ्यायला त्रास होतो आणि शरीरातील ऑक्सिजनची पातळी खालावते. पल्स ऑक्सिमीटरमध्ये बोट ठेवल्यानंतर रक्तातील ऑक्सिजनची मात्रा मोजली जाते. त्याचप्रमाणे पल्सरेट अर्थात हृदयाच्या ठोक्यांचे रीडिंगदेखील मिळते. कोरोनाबाधित रुग्णांना दर दोन तासांनी ऑक्सिजनची मात्रा तासण्याचा सल्ला दिला जातो. रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण ९४ टक्क्यांहून जास्त असले पाहिजे, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मात्र ऑक्सिजनची मात्र त्यापेक्षा खालावल्यास आणि बराच वेळ तशीच राहिल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधणे आवश्यक असते.
उत्पादनाची विश्वासार्हता तपासणे आवश्यक
सध्या विविध किमतींचे ऑक्सिमीटर बाजारात उपलब्ध आहेत. त्यांच्या किमती ५०० रुपयांपासून ते २००० रुपयांपर्यंत आहेत. कोणताही ऑक्सिमीटर घेताना कंपनीचा ब्रँड आणि उत्पादनाची विश्वासार्हता तपासून पाहणे आवश्यक मानले जाते. सध्या बहुतांश कंपन्यांचे ऑक्सिमीटर चीन, तैवान येथून आयात केले जातात. भारतीय बनावटीच्या ऑक्सिमीटरचे प्रमाण कमी असल्याने चिनी बनावटीचे ऑक्सिमीटर विकले जात असल्याचे दिसून येत आहे.
असे वापरा ऑक्सिमीटर-डॉ. गोसावी
मेडिकलच्या औषधवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. राजेश गोसावी यांनी सांगितले, पल्स ऑक्सिमीटरमधील हिरव्या किंवा लाल लाईटवर आपले नख पूर्ण बसेल असे ठेवायला हवे. पल्स ऑक्सिमीटरला दुसऱ्या हाताने दाबू नका किंवा बोटानेही दाब आणू नका.
हाताच्या मधल्या बोटाला लावणे योग्य
डॉ. गोसावी यांच्यानुसार, हाताच्या मधल्या बोटाला किंवा अंगठ्याच्या बाजूच्या बोटाला पल्स ऑक्सिमीटर लावल्यास चांगले रिझल्ट येतात.
बसून, झोपून पल्स ऑक्सिमीटर वापरता येते
तुम्ही झोपून असाल किंवा बसून असल्यास म्हणजेच रिलॅक्स होऊन पल्सऑक्सिमीटरचे रीडिंग घ्यायला हवे.जास्त असलेले रीडिंग गृहीत धरावे. पल्स ऑक्सिमीटर लावल्यावर जास्त असलेले रीडिंग गृहीत धरायला हवे
तीस सेकंदांपर्यंत बोटाला लावूनऑक्सिमीटर ठेवावे-डॉ. गुप्ता
सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील रेस्पिरेटरी फिजिओलॉजी तज्ज्ञ डॉ. शिल्पा गुप्ता यांनी सांगितले, साधारण तीस सेकंदांपर्यंत बोटाला आॅक्सिमीटर लावून ठेवल्यानंतर आलेले रीडिंग घ्यावे.
९४च्या खाली आल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा
डॉ. गुप्ता म्हणाल्या, शरीरातील ऑक्सिजनचे योग्य प्रमाण हे ९८ असते. यामुळे ९४च्या खाली ऑक्सिजनचे प्रमाण जात असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
खोलीत सहा मिनिटे वॉक करून रीडिंग घ्यावे.
९४ व त्यापेक्षा कमी रीडिंग दाखवत असल्यास खोलीत सहा मिनिटे चालायला हवे. त्यानंतर रीडिंगच्या तीन ते चार टक्क्याने ऑक्सिजन पातळी कमी दाखवित असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. आजारी व्यक्तीने चालण्याचा प्रयत्न करू नये.