‘फलोदी बाजार’च्या अंदाजांचा झाला ‘फालुदा, सटोड्यांचे अंदाज धुळीत
By योगेश पांडे | Published: December 4, 2023 05:20 AM2023-12-04T05:20:24+5:302023-12-04T05:20:45+5:30
सर्वसाधारणत: सट्टाबाजारात अंदाजाच्या आधारे मोठ्या प्रमाणात सट्टा लावला जातो
नागपूर : मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थानच्या निकालानंतर केवळ काँग्रेसलाच नव्हे, तर सट्टाबाजारालादेखील मोठा धक्का बसला. बहुतांश ‘एक्झिट पोल्स’ आणि सट्टाबाजारातील अंदाज अक्षरश: धुळीला मिळाले. राजस्थानमधील ‘फलोदी’ बाजाराच्या आधारावर अनेकांनी विविध कयास वर्तवीत सट्ट्याचे भाव बदलले होते. मात्र, निकालानंतर या सगळ्या भाकितांवर पाणी फेरले गेले. सट्टाबाजारातील अंदाजावर डोळे बंद करून विश्वास करणाऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला. छत्तीसगडच्या धक्क्यामुळे एकीकडे सट्टा लावणाऱ्यांच्या खिशातून पैसा गेला असला तरी बुकी मात्र मालामाल झाले.
सर्वसाधारणत: सट्टाबाजारात अंदाजाच्या आधारे मोठ्या प्रमाणात सट्टा लावला जातो. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ आणि तेलंगणा या राज्यांच्या निवडणूक निकालांवरदेखील भरभरून सट्टा लावला गेला. फलोदीच्या आकड्यांकडे सटोड्यांचे लक्ष लागले होते. तेथील आकडेवारीने राजस्थानमध्ये भाजपचे सरकार येत असल्याचे स्पष्ट केले होते, तर मध्य प्रदेशात काँग्रेस-भाजपमध्ये काट्याची टक्कर व छत्तीसगडमध्ये काँग्रेसला झुकते माप दिले होते. त्याच्या आधारावर लोकांनी काँग्रेसच्या विजयावर कोट्यवधी रुपये लावले. एक्झिट पोलच्या दिवशी सट्टाबाजार खुलला अन् लगवाडी खयवाडीही सुरू झाली, तर निकालाच्या एक दिवस अगोदर मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसच्या अंदाजापेक्षा थोड्या अधिक येतील असे भाकीत वर्तविण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात मतदारांनी भाजपच्या बाजूने कौल दिला आणि पैसे लावणाऱ्यांचे धाबे दणाणले. विशेषत: छत्तीसगडमधील भाजपच्या विजयानंतर तर अनेकांना घाम फुटला. एकीकडे सट्टेबाज कंगाल झाले तर बुकी मात्र मालामाल झाले.
आता मुख्यमंत्रिपदावर सट्टाबाजार गरम
दरम्यान, निकालानंतर सट्टाबाजार मुख्यमंत्रिपदाच्या नावांवरून गरम झाला आहे. राजस्थानमध्ये वसुंधरा राजे, अर्जुन मेघवाल यांची नावे आघाडीवर आहेत. सट्टाबाजारात वसुंधरा राजे यांना झुकते माप देण्यात आले आहे. दुसरीकडे छत्तीसगड व मध्य प्रदेशमधील मुख्यमंत्रिपदाच्या नावांवरूनदेखील सट्टा सुरू झाला आहे.