प्रीतीने घातली पन्नास लाखांची टोपी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2020 12:17 AM2020-06-18T00:17:09+5:302020-06-18T00:20:20+5:30
कुख्यात प्रीती दास ऊर्फ हसीना आप्पा हिने आपल्याला ४९ ते ५० लाख रुपयांनी गंडविले, असा तक्रार अर्ज इर्शाद नामक व्यक्तीने आज पाचपावली पोलिस ठाण्यात दिला. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी प्रीतीच्या चौकशीत थेट लक्ष घालणे सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर प्रीती दासची पोलीस कोठडीही तीन दिवसांनी वाढली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कुख्यात प्रीती दास ऊर्फ हसीना आप्पा हिने आपल्याला ४९ ते ५० लाख रुपयांनी गंडविले, असा तक्रार अर्ज इर्शाद नामक व्यक्तीने आज पाचपावली पोलिस ठाण्यात दिला. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी प्रीतीच्या चौकशीत थेट लक्ष घालणे सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर प्रीती दासची पोलीस कोठडीही तीन दिवसांनी वाढली आहे. तिला आज न्यायालयाने २० जूनपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
कुख्यात प्रीती ही एका फसवणूक प्रकरणात अडकली होती. त्यावेळी बँक कन्सल्टंट आणि रिकव्हरी एजंट म्हणून काम करणाºया इर्शादसोबत तिची ओळख झाली. प्रीतीने त्याच्यावर जाळे फेकून त्याच्याकडे जाणे-येणे सुरू केले. इर्शादच्या तक्रार अर्जानुसार प्रीतीने त्याच्याशी जवळीक साधून त्याचे व्यवहार हाती घेतले. बँकेत पैसे जमा करण्याच्या बहाण्याने बँक खात्याची माहिती करून घेतल्यानंतर तिने त्याची रक्कम हडपणे सुरू केले. एक दिवस आपली बँक खाती तपासली असता मला बँक खात्यात केवळ वीस हजार रुपये असल्याचे कळले. प्रीतीला याबाबत विचारणा केली असता तिने त्याला जास्त चौकशी केल्यास बलात्काराच्या आरोपात फसवीन, अशी धमकी देऊन ब्लॅकमेल करणे सुरू केल्याचे इर्शादने आज पाचपावली पोलिसांना सांगितल्याचे समजते. या घडामोडीला पाचपावलीचे ठाणेदार किशोर नगराळे यांनी दुजोरा दिला आहे.
दरम्यान, पोलीस आयुक्त राहुल माकणीकर यांनी आज पाचपावली आणि लकडगंज पोलिसांकडून तपासाबाबत आतापर्यंत काय प्रगती झाली याबाबत माहिती जाणून घेतली. यापुढे कोणता आणि कसा तपास करावा त्या संबंधातही दिशानिर्देश दिले. आजपासून या तपासावर आपणही नजर ठेवणार असल्याची माहिती त्यांनी ‘लोकमत'ला दिली.
कुख्यात प्रीतीच्या संपर्कातील मंडळीची चौकशी सुरू
प्रीती दास हिच्या संपर्कात असलेल्या मंडळीची यादी पोलिसांनी तयार केली असून ते प्रीतीच्या वारंवार का संपर्कात होते, याची पोलीस चौकशी करीत आहेत. आज पाचपावली पोलिसांनी रवी घाडगे पाटील नामक तरुणाची चौकशी केली.
विशेष तपास पथकाची मागणी
दरम्यान, प्रीतीविरुद्ध शेकडो तक्रारदार तक्रारी करण्याच्या मानसिकतेत आहेत. मात्र त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे दडपण आहे. त्यामुळे पोलिसांनी प्रीती दासच्या गुन्ह्यांची चौकशी करण्याकरिता स्वतंत्र तपास पथक निर्माण करावे, अशी भावना लोकांची झाली आहे.