प्रीती रायबोलेने दिले ५० लाखाचे कर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2020 12:46 AM2020-08-25T00:46:36+5:302020-08-25T00:47:36+5:30
अवैध सावकारीद्वारे गरजूंचे शोषण करणाऱ्या प्रीती रायबोलेने एकूण ५० लाख रुपयाचे कर्ज दिले आहे. प्रीतीची शिवीगाळी, धमक्या व मारहाणीमुळे पीडित व्यक्ती तक्रार करण्यास भीत होते. अशाच काही व्यक्तींचा गुन्हे शाखेला शोध लागला आहे. त्यांना विचारपूस केल्यानंतर अनेक नवीन बाबी पुढे येण्याची शक्यता आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अवैध सावकारीद्वारे गरजूंचे शोषण करणाऱ्या प्रीती रायबोलेने एकूण ५० लाख रुपयाचे कर्ज दिले आहे. प्रीतीची शिवीगाळी, धमक्या व मारहाणीमुळे पीडित व्यक्ती तक्रार करण्यास भीत होते. अशाच काही व्यक्तींचा गुन्हे शाखेला शोध लागला आहे. त्यांना विचारपूस केल्यानंतर अनेक नवीन बाबी पुढे येण्याची शक्यता आहे. दरम्यान, पोलिसांनी सोमवारी प्रीतीला न्यायालयात हजर करून तिच्या पोलीस कोठडीमध्ये एक दिवसाची वाढ मिळवली.
पोलिसांनी प्रीतीला शबनम शेख हिची फसवणूक करण्याच्या व अवैध सावकारीच्या प्रकरणात अटक केली आहे. शबनमने प्रीतीकडून दोन लाख रुपयाचे कर्ज घेतले होते. त्यानंतर केवळ एक वर्षात ९ लाख रुपये परत केले. असे असताना प्रीती शबनमला धमकावत होती. सूत्रांच्या माहितीनुसार, प्रीती दीर्घ काळापासून अवैध सावकारी करीत आहे. गरजू व्यक्ती तिच्या जाळ्यात फसतात. त्यात महिलांचे प्रमाण अधिक असते. सुरुवातीला ती दागिने गहान ठेवून पाच-दहा हजार रुपयाचे कर्ज देते. पुढे मूळ रकमेपेक्षा व्याज अधिक झाल्यामुळे कर्जदारांना दागिने सोडवणे कठीण जाते. त्यामुळे प्रीती गहाण दागिने पचवते. काही महिलांनी पतीच्या मागे दागिने गहाण ठेवले होते. कोरोना संक्रमणामुळे पतीने हिशेब विचारणे सुरू केल्यानंतर अनेक महिलांनी दागिने चोरी झाल्याच्या खोट्या गोष्टी सांगितल्या. सावकारी चालायला लागल्यानंतर प्रीती मोठ्या रकमेचे कर्ज द्यायला लागली होती. सर्व कर्जदारांमध्ये प्रीतीची दहशत होती. कुणीही तिच्यापुढे तोंड उघडत नव्हते. प्रीतीने मासिक ३ टक्के व्याजाने कर्ज देत असल्याची माहिती दिली आहे. हे व्याज वार्षिक ३६ टक्के होते. सूत्रांनी मात्र ती २० ते ३० टक्के व्याज वसूल करीत होती असे सांगितले आहे.