उपराजधानीत भडकतेय गँगवार
By admin | Published: April 4, 2015 02:16 AM2015-04-04T02:16:09+5:302015-04-04T02:16:09+5:30
एकेकाळी शांत असलेली उपराजधानी गँगवारच्या घटनांनी थरारली आहे. भररस्त्यांवर गुन्हेगारी टोळ््या परस्परांवर
कारागृहात बनतात टोळ्या वाढत्या गुन्हेगारीने नागपूरकर त्रस्त कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा
नागपूर : एकेकाळी शांत असलेली उपराजधानी गँगवारच्या घटनांनी थरारली आहे. भररस्त्यांवर गुन्हेगारी टोळ््या परस्परांवर देशी कट्ट्यातून गोळीबार करीत आहेत. वर्चस्वातून गुन्हेगारांचे, खंडणी वसुलीतून व्यापाऱ्यांचे आणि भूखंड बळकावण्यातून सामान्य माणसाचे रक्त सांडत आहे. लागोपाठ खुनाच्या घटना घडत आहेत. परिणामी स्थानिक रहिवाशांना दहशतीत जगावे लागत आहे.
गुन्हेगारी टोळ्यांचा उगम कारागृहातून होत आहे. येथील उंच भिंतीआड सर्रास मोबाईल पोहोचून टोळ्यांकडून खंडणी आणि सुपारी खुनासाठी कटकारस्थाने रचली जात आहेत. कुख्यात राजा गौस टोळीतील खतरनाक तीन सदस्यांसह पाच जण मंगळवारच्या पहाटे कारागृहाची भिंत चढून पसार झाले. इंदोरा भागात दिवसाढवळ्या गुन्हेगारांच्या दोन टोळ्यांमध्ये देशी कट्ट्यातून फैऱ्या झाडण्यात आल्या. त्यामुळे उपराजधानी किती सुरक्षित असा प्रश्न निर्माण झाला आहे.
सीताबर्डीतील व्यापाऱ्यांकडून खंडणी वसुलीतून या भागात गुंडांच्या टोळ््या सक्रिय झाल्या. यासाठी एकेकाळी कुख्यात धनी-मनीचे नाव कुख्यात होते. त्यांचे सीताबर्डीवर एकछत्री राज्य केले. त्याचकाळात अनिल पौनीपगार, राजीव दीक्षित, भय्या केसरी यांचीही बर्डीत दहशत होती. त्यानंतर राजू काल्या, कैलास यादव, गाडगीलवार बंधू, अजद ऊर्फ अम्मू तिवारी, शेख शरीफ यांच्या टोळ्या उदयास आल्या. वर्चस्वावरून अनेकदा गँगवारही भडकले. या सर्वांना येथील व्यापारी व चिल्लर विक्रेत्यांवर वर्चस्व ठेवायचे होते. पोलिसांचे गुंडांशी संबंध असल्याने त्यांची गुन्हेगारी चांगलीच फोफावली. नुकतीच ७ मार्च २०१५ रोजी तेलीपुरा इलेक्ट्रॉनिक मार्केट येथे मोबाईल दुकानात घुसून सशस्त्र हल्ला करून मोबाईल व्यापारी भरत खटवानी यांची हत्या करण्यात आली. खुनाचा सूत्रधार शरीफ व त्याचा भाऊ अशफाक हे या भागात खंडणीवसुली आणि अमलीपदार्थ विक्रीचा व्यवसाय करतात.
भू-माफियांचा कुणबा
नागपूर शहर झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे शहरालगतच्या जमिनींना सोन्याचे भाव आले आहेत. त्यामुळे अनेक गुंड जमीन बळकावण्याच्या धंदा करू लागले आहेत. पश्चिम नागपुरातील काटोल रोड परिसरात राहणारा एक ‘कुणबा’ या धंद्यात सक्रिय आहे. हा कुणबा भू-माफिया म्हणून कुप्रसिद्ध आहे. रिकामे प्लॉट, जमीन, बळजबरीने शेती बळकावणे हा त्यांचा मुख्य धंदा आहे. अवैध दारूचेही मोठे अड्डे आहेत. सराईत गुंडांच्या टोळीद्वारे हा धंदा चालतो. त्यावर नियंत्रण याच कुटुंबाद्वारे केले जाते. पश्चिम नागपूरमध्ये या कुटुंबाची चांगलीच दहशत आहे. या कुटुंबातील काही सदस्य राजकारणात सक्रिय आहेत. त्यामुळे त्यांना राजकीय पाठबळ असल्याने यांच्याविरोधात सहसा कुणी आवाज उचलत नाही. टोल नाक्यावर वसुलीचे काम करण्यासाठी सुद्धा गुंड प्रवृत्तीच्या लोकांनाच ठेवले जाते. शहराबाहेरच्या एका नाक्यावर टोलवसुलीचे काम या टोळीतील सदस्यांद्वारेच केले जात असल्याने यावर शिक्कामोर्तब झाले आहे.