गटशेतीला प्राधान्य द्यावे
By admin | Published: May 1, 2017 01:29 AM2017-05-01T01:29:12+5:302017-05-01T01:29:12+5:30
कमी शेती असलेल्या लहान शेतकऱ्यांनी आता गटशेतीकडे वळावे. २० लहान शेतकरी आणि १०० एकर जमीन एकत्रित करून पीक काढले तर
मुख्यमंत्री फडणवीस : स्वयंचलित हवामान केंद्राचे उद्घाटन
नागपूर : कमी शेती असलेल्या लहान शेतकऱ्यांनी आता गटशेतीकडे वळावे. २० लहान शेतकरी आणि १०० एकर जमीन एकत्रित करून पीक काढले तर शासनाच्या सर्व योजना या शेतकरी गटाला प्राधान्याने दिल्या जातील तसेच ठिबक सिंचनाकडे आता शेतकऱ्यांनी वळावे म्हणजे कमी पाण्यात अधिक पीक घेता येईल, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे केले.
कृषी विभागाच्या महावेध प्रकल्पांतर्गत नागपुरातील डोंगरगाव येथे राज्यातील पहिले स्वयंचलित हवामान केंद्राचे उद्घाटन करताना ते बोलत होते. यावेळी ‘उन्नत शेती समृध्द शेतकरी मोहिमें’ंतर्गत शेतकरी मेळावा सुद्धा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी प्रामुख्याने राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ. सुधीर पारवे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार, प्रधान सचिव विजयकुमार, कृषी आयुक्त विकास देशमुख, जि.प. अध्यक्ष निशा सावरकर, विजय घावटे, विभागीय आयुक्त अनुपकुमार, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, जि.प. सदस्य रुपराव शिंगणे, पं.स. सदस्य रेखा मसराम, सीईओ कादंबरी बलकवडे आदी उपस्थित होते.
राज्यातील पहिले स्वयंचलित हवामान केंद्र नागपुरात होत असल्याचे सांगताना मुख्यमंत्री म्हणाले- यामुळे आता गावपातळीवर शेतकऱ्यांना हवामानाचे अचूक अंदाज मिळणार आहे. त्यामुळे पिकांचे नियोजन करणे सोपे होईल. देशातील हा युनिक प्रकल्प असून यंदा २०६५ स्वयंचलित हवामान केंद्रे राज्यात उभी राहतील. पाऊस किती पडणार, कसा पडणार, वातावरण कसे राहणार याची नेमकी माहिती प्रत्येक ग्रामपंचायतीला प्राप्त होणार आहे. जिल्ह्यातील संपूर्ण ग्रामपंचायती आता डिजिटल झाल्या आहेत. शेतकऱ्यांना दर अर्ध्या तासाने एसएमएसद्वारे हवामानाची माहिती उपलब्ध होईल.यांत्रिकी शेती आणि गटशेतीवर शेतकऱ्यांनी भर द्यावा असे सांगताना मुख्यमंत्र्यांनी जलयुक्त शिवारच्या कामांमुळे राज्यात मोठ्या प्रमाणात पाणी साठवले गेले आहे. परिणामी टँकरने पाणीपुरवठ्याची संख्या ८० टक्क्यांनी कमी झाली आहे. त्यामुळेच कृषी विकास दर आपण साडेबारा टक्केपर्यंत गाठू शकलो. एकर, दोन एकर, चार एकर शेती असलेल्या शेतकऱ्यांनी गट शेती करावी. त्यामुळेच फायदा होणार आहे. जिल्ह्यात शेतकऱ्यांचे मोठे गट तयार झाले पहिजेत. जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष घालावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. यावेळी स्कायमेटचे मुख्य अधिकारी जतिनसिंह व कृषी विभागाचे प्रधान सचिव विजयकुमार यांचे प्रकल्पाच्या संदर्भातील कराराचे हस्तांतरण करण्यात आले. प्रास्ताविक प्रधान सचिव विजय कुमार यांनी केले. रेणुका देशकर यांनी संचालन केले. कृषी आयुक्त विकास देशमुख यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
आतापर्यंत पाच लाख टन तूर खरेदी
राज्यात यंदा २० लाख टन तुरीचे उत्पादन झाले असून तुरीचा शेवटचा दाणा आणि शेवटच्या शेतकऱ्याची तूर शासन खरेदी करणार आहे. आतापर्यंत शासनाने पाच लाख टन तूर खरेदी केली आहे. शेतकऱ्यांच्या नावावर व्यापाऱ्यांना आपलं चांगभलं शासन करू देणार नाही. अशा व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशाराही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. शासन सजग आहे. गेल्या १५ वर्षांत खरेदी झाली नाही एवढी तूर शासनाने खरेदी केली असल्याचेही ते म्हणाले.
प्रत्येक गावात
डिजिटल बोर्ड
हवामनाचा अचूक अंदाज नसल्यामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी राज्यात प्रथमच स्वयंचलित हवामान केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना हवामानाची अचूक माहिती प्रत्येक गावात डिजिटल की आॅक्स बोर्डाच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. अचूक हवामानविषयक पूर्व माहितीमुळे शेतीचे नियोजन करणे सुलभ होणार असून हा प्रकल्प शेतकऱ्यांना समृद्धीकडे नेणारा असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
पालकमंत्र्यांचे अभिनंदन
विदर्भ मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या कृषिपंपांना मोठ्या प्रमाणात कनेक्शन दिल्यामुळे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केले. तसेच शेतकऱ्यांना दिवसा १२ तास वीज मिळावी म्हणून ऊर्जामंत्री कृषी सोलर फिडरची संकल्पना वास्तवात आणीत आहेत. हा प्रकल्प लवकरच आकार घेणार आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, शेतकऱ्यांचे एकरी उत्पादन कसे वाढेल या पद्धतीने यंदा आम्ही नियोजन केले आहे. शेतकऱ्याला एकरी दोन लाख रुपये उत्पन्न मिळावे म्हणून बी-बियाणे, पाणी, खते आणि शासनाच्या योजनांसह शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या सर्व सेवा आॅनलाईन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांना आता जिल्ह्याच्या ठिकाणी येण्याची आवश्यकता राहिली नाही. शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून मुख्यमंत्र्यांच्या प्रत्येक आदेशाचे काटेकोर पालन आम्ही करीत आहोत. दोन लाख रुपये एकरी उत्पादन घेणाऱ्या पाच शेतकऱ्यांचा यानंतर जाहीर सत्कार करण्यात येणार असल्याचेही पालकमंत्री म्हणाले.
हवामान केंद्राचा शेतकऱ्यांना
फायदा : कृषिमंत्री
नवीन स्वयंचलित हवामान केंद्राचा शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचे सांगताना कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर म्हणाले- गेल्या २०११-१२ पासून हा प्रस्ताव शासन दरबारी प्रलंबित होता. पण मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशांमुळे या योजनेची अंमलबजावणी होत आहे. जुलैपर्यंत २०६५ स्वयंचलित हवामान केंद्र