जिल्ह्यातील गर्भवतींना दिलासा देणारी ‘माहेरघरे’ रद्द!

By गणेश हुड | Published: July 17, 2024 07:38 PM2024-07-17T19:38:15+5:302024-07-17T19:38:31+5:30

सुरक्षित मातृत्वासाठी रामटेक, पारशिवनीत प्रस्तावित सहा माहेरघर बारगळले

pregnancy room which provides relief to pregnant women in the district, has been cancelled | जिल्ह्यातील गर्भवतींना दिलासा देणारी ‘माहेरघरे’ रद्द!

जिल्ह्यातील गर्भवतींना दिलासा देणारी ‘माहेरघरे’ रद्द!

नागपूर : गावखेड्यापासून तर तांडा,  आदिवासीपर्यंत पोहचण्याची साधनसुविधा नसताना आरोग्य विभागाने सुरक्षित प्रसूतीसाठी ‘माहेरघर’ ही अभिनव योजना राबविली. यामुळे अतिदुर्गम भागात महिलांना  दिलासा मिळाला. मात्र नागपूर जिल्ह्यात रामटेक, पारशिवनी तालुक्यातील प्रस्तावित सहा माहेरघरे  रद्द करण्यात आल्याची  माहिती आहे.

जागतिक आरोग्य संघटनेसह विविध स्त्रीरोग व प्रसूतीरोग तज्ज्ञांच्या संघटनेच्या निरीक्षणानुसार प्रसूतीच्या वेळी सुमारे ३० टक्के मातांना जोखीम असते. यामुळे दर लाखामागे ६१ गर्भवती माता दगावतात. मातामृत्यू दर कमी करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने माहेरघर ही संकल्पना पुढे आणली. संकल्पनेनुसार गावखेड्यापासून तर तांडा, नक्षल भागातील आदिवासीपर्यंत पोहोचण्याची साधनसुविधा नसताना आरोग्य विभागाने सुरक्षित प्रसूतीसाठी ही योजना सुरू केली होती.

नागपूर जिल्ह्यात रामटेक, पारशिवनी तालुक्यात ६ माहेरघरे उभारण्यात येणार होती. परंतु, ती अद्यापही उभारण्यात आली नाहीत. दरम्यान, पूर्व विदर्भात गडचिरोली, गोंदिया व चंद्रपूरसहित पश्चिम विदर्भात मेळघाट, धारणी, चिखलदरा, यवतमाळ तसेच नंदूरबार या भागात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बाजूला ९१ माहेरघरे उभारली गेली. दुसऱ्या टप्प्यात रामटेक आणि पारशिवनी तालुक्यात ६ माहेरघरे उभारण्यात येणार होती. यासाठी निधीची सोय करण्यात आली. कोणत्या ठिकाणी माहेरघर उभारण्यात येतील, ते प्राथमिक आरोग्य केंद्रही निश्चित झाले होते. 

आतापर्यंत १० हजार प्रसूती
राज्यभरात उभारण्यात आलेल्या ९१ माहेरघरांमध्ये सुमारे १० हजारांवर प्रसूती झाल्या आहेत. यात सर्वाधिक प्रसूतीची नोंद गडचिरोली जिल्ह्यांत झाली आहे. गर्भवती मातेसोबत सहायक म्हणून महिला किंवा पुरुषाची मजुरी बुडू नये यासाठी मजुरीचा मोबदला म्हणून दरदिवशी ३०० रुपये दिले जातात.

Web Title: pregnancy room which provides relief to pregnant women in the district, has been cancelled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.