‘प्रेग-कोविड रजिस्ट्री’मध्ये गर्भवतींच्या आरोग्याचा डेटाबँक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 10:34 AM2021-08-21T10:34:23+5:302021-08-21T10:36:13+5:30
Nagpur News इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्च(आयसीएमआर)अंतर्गत राष्ट्रीय प्रजनन स्वास्थ्य शोध संस्था(एनआयआरआरएच)ने गर्भवती महिलांवर होणाऱ्या प्रभावाकडे लक्ष केंद्रित करीत ‘प्रेग-कोविड रजिस्ट्री’ची स्थापना केली.
निशांत वानखेडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना महामारीच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेदरम्यान गरोदर महिला व त्यांच्या बाळाचे आरोग्य हा एकूणच देशाच्या आरोग्य यंत्रणेसाठी संवेदनशील विषय होता. ही गंभीरता लक्षात घेता, इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्च(आयसीएमआर)अंतर्गत राष्ट्रीय प्रजनन स्वास्थ्य शोध संस्था(एनआयआरआरएच)ने गर्भवती महिलांवर होणाऱ्या प्रभावाकडे लक्ष केंद्रित करीत ‘प्रेग-कोविड रजिस्ट्री’ची स्थापना केली. याद्वारे गर्भवती व अर्भकाच्या आरोग्याची एकूणच डेटाबँक तयार करण्यात आली आहे. (Pregnant Health Databank in Preg-Covid Registry)
‘प्रेग-कोविड रजिस्ट्री’ मोहिमेचे प्रमुख डॉ. राहुल गजभिये यांनी एकूणच कामाविषयी माहिती दिली. एनआयआरआरएचच्या माजी संचालिका डॉ. स्मिता महाले यांच्या समन्वयातून आयसीएमआर-एनआयआरआरसी, मुंबई तसेच महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभाग आणि टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज व नायर रुग्णालय मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने प्रेग-कोविड रजिस्ट्रीची स्थापना एप्रिल २०२० मध्ये करण्यात आली. डॉ. राकेश वाघमारे व डॉ. नीरज महाजन हे या संशोधन टीमचा भाग आहेत. महाराष्ट्रातील १८ मेडिकल कॉलेज आणि मुंबईचे नायर रुग्णालय अशा १९ केंद्रावर गर्भवती महिलांची नोंदणी करण्यात आली. या केंद्रांवर दोन्ही लाटेदरम्यान ६,५०० गरोदर व स्तनदा मातांची नोंद करून अभ्यास करण्यात आला.
वेगवेगळ्या स्तरावर अभ्यास
- कोरोना विषाणूचा गर्भवती महिला, गर्भ तसेच नवजात बालक व स्तनदा मातांच्या आरोग्यावर काय परिणाम होतो.
- कोरोना संक्रमित गर्भवती महिलेमुळे गर्भावर आणि नवजात बाळांवर होणारे परिणाम व ते कसे दूर करता येईल.
- अतिश्रीमंत, मध्यम वर्ग व गरीब वर्गातील गर्भवती महिलांच्या आरोग्यावर कोरोनाचा प्रभाव.
- महामारीच्या दुसऱ्या लाटेदरम्यान गर्भावस्थेदरम्यान आणि स्तनदा मातांच्या मानसिक व शारीरिक आरोग्यावर विषाणूच्या प्रभावामुळे कशी गुंतागुंत निर्माण झाली.
- टीबी संक्रमित गर्भवती महिला व तिच्या बाळावर कोरोना संक्रमणामुळे झालेले गुंतागुंतीचे परिणाम.
- सार्स कोविड-२ संक्रमित गर्भवती महिलांवर डेंग्यू व मलेरियाचे परिणाम.
- संक्रमित गर्भवतींवर हृदयरोगामुळे होणारे परिणाम.
- सिकलसेलग्रस्त गर्भवती महिलांवर कोरोना संक्रमणामुळे होणारे परिणाम.
- गर्भवती महिलांचे लसीकरण व त्याचे परिणाम.