गरोदर मातांना लसीकरणाचा धोका नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:07 AM2021-04-27T04:07:40+5:302021-04-27T04:07:40+5:30
कोविड संवादमध्ये तज्ज्ञांचा सल्ला लोकमत न्यूज् नेटवर्क नागपूर : गरोदर मातांची रोग प्रतिकारशक्ती कमी असते. त्यामुळे पहिल्या १४ ...
कोविड संवादमध्ये तज्ज्ञांचा सल्ला
लोकमत न्यूज् नेटवर्क
नागपूर : गरोदर मातांची रोग प्रतिकारशक्ती कमी असते. त्यामुळे पहिल्या १४ ते २६ आठवड्यात त्यांनी कोविड लसीकरण करून घेतले, तर त्यांना गंभीर आजार होणार नाही. जन्मणाऱ्या बाळालाही धोका संभवणार नाही, अशी माहिती कोविड संवादच्या माध्यमातून स्त्री रोगतज्ज्ञांनी दिली.
महापालिका आणि इंडियन मेडिकल असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कोविड संवाद या फेसबुक लाइव्ह कार्यक्रमात सोमवारी प्रसूती तथा स्त्री रोगतज्ज्ञ सोसायटीच्या अध्यक्ष डॉ. अलका मुखर्जी आणि इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या सहायक प्राध्यापक व स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. भक्ती गुर्जर यांनी कोविड आणि स्त्रियांचे आजार यावर मार्गदर्शन केले.
जर गरोदर माता कोरोना पॉझिटिव्ह आली तर त्याचा परिणाम गर्भावर आणि नंतर जन्मणाऱ्या बाळावर पडतो का, गरोदर असताना कोविड प्रतिबंधात्मक लस घेणे योग्य आहे काय, आदी प्रश्नांना उत्तरे देत शंकांचे निरसन अलका मुखर्जी यांनी केले.
गरोदर असताना कोविड पॉझिटिव्ह आले तर कुठला औषधोपचार करायचा, लसीचा पहिला डोज घेतल्यानंतर जर पॉझिटिव्ह आले तर दुसरा डोज कधी घ्यायचा, कोविड काळात गर्भ राहिला तर गर्भपात करायचा का, त्याची गरज आहे का, पॉझिटिव्ह असताना नवजात बाळाला स्तनपान करता येते का, आदी प्रश्नांना भक्ती गुर्जर यांनी उत्तरे दिली.