गावच्या वाटेवर अडखळताहेत गर्भवती महिलांची पावलं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 11:59 AM2020-05-12T11:59:52+5:302020-05-12T12:00:14+5:30

कामगारांचे अनेक जत्थे गावाकडे निघालेत, आपल्या चिल्यापिल्यांसह संसार पाठीवर घेऊन हे काफिले निघाले आहेत. यात अनेक गर्भवती महिलाही आहेत.

The pregnant women are stumbling on the way to the village | गावच्या वाटेवर अडखळताहेत गर्भवती महिलांची पावलं

गावच्या वाटेवर अडखळताहेत गर्भवती महिलांची पावलं

Next

गोपालकृष्ण मांडवकर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कामगारांचे अनेक जत्थे गावाकडे निघालेत, आपल्या चिल्यापिल्यांसह संसार पाठीवर घेऊन हे काफिले निघाले आहेत. यात अनेक गर्भवती महिलाही आहेत. या महिलांना तहान लागली. मात्र गावकऱ्यांनी पाणीही दिले नाही; तहानेने व्याकुळलेल्या त्या महिला बोअरवेलवर पाणी हापसण्यासाठी गेल्या, मात्र त्यांना गावकऱ्यांनी तेथूनही हाकलून लावले. अंगावर शहारे आणि चीड आणणारे हे वास्तव सांगितले पुण्यावरून रिवाकडे (मध्य प्रदेश) निघालेल्या एका स्थलांतरित युवकाने.
अभिजीत असे नाव असलेला हा युवक मूळचा रिवाचा आहे. पुण्यातील एका सेक्युरिटी कंपनीमध्ये गावाकडच्या १९ जणांसोबत तोसुद्धा काम करायचा. काम बंद झाल्याने त्यातील दोघेजण गावाकडे निघाले. १० किलोमीटर पायी चालत आल्यावर एका व्यक्तीने औरंगाबादपर्यंत सोडले. खायला अन्नही दिले. पुढचा प्रवास पायीच सुरू केला. सुमारे २५ ते ३० किलोमीटर पायी चाललल्यावर उत्तर प्रदेशतील एका व्यक्तीने वाहनात लिफ्ट दिली. बुटीबोरीपर्यंत सोडले. तिथून आता त्यांचा पुन्हा पायी प्रवास सुरू झाला आहे. वाटेत भेटल्यावर त्याने आपबीती ऐकविली. महामार्गावरील गावकरी प्रचंड दहशतीत असल्याने मजुरांना मदत करण्याचेही टाळतात. साधे पाणीही देत नसल्याचा अनुभव त्याने सांगितला. अनेक कामगारांची कुटुंबे गॅस सिलिंडर सोबत घेऊन निघाले आहेत. रेशन, पाणीही त्यांच्यासोबत आहे. मात्र पाणी किती दिवस पुरणार? वाटेत अन्न शिजवून त्यांचा प्रवास सुरू आहे. अन्न शिजविण्यासाठी पाण्याची गरज पडते. मात्र दहशतीमधील गावकरी त्यांना हाकलत असल्याचे सांगताना तो गहिवरला. कामगारांच्या एका काफिल्यामध्ये पाच गर्भवती महिलाही आहेत. एका गावात त्या पाण्यासाठी गेल्या. मात्र त्यांंना पाणी दिलेच नाही. बोअरवलेवर त्या पाणी भरण्यासाठी गेल्या, मात्र त्यांना गावकºयांनी तेथूनही हाकलून लावल्याचे सांगताना त्याच्या डोळ्यात पाणी आले.

पानी भी नहीं दोगे, तो दुबारा क्यों आयेंगे वापस?
हा युवक खूपच उद्विग्न दिसला. ‘कोरोना खत्म होने के बाद फिरसे काम पर आओगे क्या’, विचारल्यावर तो म्हणाला, ‘जब प्यासे को पानी भी नहीं मिलेगा, तो क्या दुबारा आयेंगे वापस? गाव में ही रहेंगे, मिलेगा वहीं काम करेंगे, उपरवाले ने बेरहमी बरती तो गाव में ही मरेंगे, लेकिन अब वापस नही आयेंगे.’

प्रवासातच संपला अख्खा पैसा
तेलंगणातील रामागुंडम येथे एका कंपनीत काम करणारे चार कामगार युवक नागपुरात जामठाजवळ भेटले. ते मूळचे पंजाबचे. रणजीतसिंग, दरबारसिंग, बिरपालसिंग आणि राजवेंदरसिंग अशी त्यांची नावे. दोन महिन्यापूर्वीच कंपनीत कामाला लागले होते. डोळ्यात स्वप्ने होती. पहिला पगार तिथे बस्तान बसविण्यात आणि रेशन घेण्यात गेला. कोरोनामुळे काम बंद पडले. ठेकेदाराने दुसरा पगार दिलाच नाही. आता जवळचा पैसा घेऊन ते अमृतसरकडे निघाले आहेत. हा सर्व पैसा प्रवासातच संपल्याने आता गावाकडे रिकाम्या हाताने परतताना त्यांना डोळ्यात मात्र प्रचंड दु:ख दाटले आहे.

 

Web Title: The pregnant women are stumbling on the way to the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.