नागपुरातील मातृसेवा संघ रुग्णालयाचा गर्भवती महिलांना घेण्यास नकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2020 06:15 PM2020-04-01T18:15:42+5:302020-04-01T18:16:08+5:30
गर्भवती महिलांच्या कुशल प्रसुतीसाठी नागपुरात मातृसेवा संघ सुतिकागृह हे विख्यात आहे आणि समाजातल्या अतिसामान्य कुटूंबांना येथून समाधान मिळत गेले आहे. मात्र, वर्तमानातील संकटाच्या काळात सर्वसामान्यांच्या हृदयात आस्थेचे स्थान असलेल्या सुतिकागृहाने गर्भवती महिलांना स्विकारण्याची टाळाटाळ सुरू केली असल्याचे स्पष्ट होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गर्भवती महिलांच्या कुशल प्रसुतीसाठी नागपुरात मातृसेवा संघ सुतिकागृह हे विख्यात आहे आणि समाजातल्या अतिसामान्य कुटूंबांना येथून समाधान मिळत गेले आहे. मात्र, वर्तमानातील संकटाच्या काळात सर्वसामान्यांच्या हृदयात आस्थेचे स्थान असलेल्या सुतिकागृहाने गर्भवती महिलांना स्विकारण्याची टाळाटाळ सुरू केली असल्याचे स्पष्ट होत आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग सर्वत्र पसरत आहे. नागपुरातही दिवसेंदिवस बाधा झालेले रुग्ण मेडिकल, मेयोमध्ये दाखल होत आहेत. अनेक संशयितांवर आयसोलेशन व क्वॉरंटाईनची प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी सरकारने अनेक खाजगी रुग्णालयांना ताब्यातही घेतले आहे. अशा स्थितीत अनेक गर्भवती महिलांना खाजगी रुग्णालयांनी मेडिकल, मेयो, डागा हॉस्पिटल, सुतिकागृह व अन्य निम्न शासकीय रुग्णालयांकडे जाण्याचा आग्रह धरला आहे. कोरोना विषाणूचा धसका म्हणून आणि खाजगी इस्पितळांकडे कोरोनाच्या उपचाराची परवानगी नसल्यामुळे गर्भवती महिलेस कुठलीही बाधा होण्यापूर्वी किंवा तशी साधारण लक्षणे आढळल्यास तात्काळ उपचार केले
जावे म्हणून हा आग्रह आहे. अशा स्थितीत मातृसेवा संघांच्या सुतिकागृहांना गर्भवती महिला प्राधान्य देत आहेत. मेडिकल, मेयो, डागा रुग्णालयात आधीच अशा महिलांची तुंबड गर्दी असल्याने पर्याय म्हणून सुतिकागृहांना पसंती दिली जात आहे. मात्र, सुतिकागृहात गर्भवती महिलांची नवी नोंदणी व तपासणी करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे चित्र आहे. नोंदणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांस विचारले असतान व्यवस्थापनाचा तसा आदेश असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे, अशा महिलांना या प्रसुतीच्या वेदना अत्यंत वेदनादायी ठरत आहेत. अशा गर्भवती महिलांनी जावे कुठे, असा प्रश्न यामुळे निर्माण होत आहे. यासोबतच आधीपासूनच उपचार घेत असलेल्या महिलांना सोनोग्राफी व इतर टेस्ट करिता खाजगी रुग्णालयांचे पत्ते दिले जात आहे. सुतिकागृहामध्ये प्रसुतीसंदर्भातल्या सर्वच अद्ययावत सुविधा असताना, येथील डॉक्टरांकडून रुग्णांना खाजगींकडे पाठविले जाणे, अनेक प्रश्नांना मार्ग मोकळे करणारे ठरत आहे.
नऊ महिन्याच्या गर्भवतीला खोकला आहे म्हणून परत पाठविले
बुधवारी कुही येथून नियमित तपासणीसाठी येणाºया सपना दशमवार यांना महाल येथील सुतिकागृहाकडून खोकला होता म्हणून त्यांना प्रवेशद्वारातूनच परत पाठविण्यात आले. त्यांना गर्भधारणेचा नववा महिना लागून १५ दिवस उलटले आहेत. अशा स्थितीत त्या कधीही प्रसुत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, नियमित तपासणीसाठी आले असता केवळ खोकला आहे म्हणून त्यांना परत पाठविण्याचा विचित्रपणा यावेळी केला गेला. अखेर प्रकरण अंगलट येण्याची शक्यता दिसताच डॉक्टरांनी तात्काळ त्यांना तपासणीसाठी बोलावले. अन्यथा, अशा काळात त्यांना नवे रुग्णालय शोधण्याची वेळ आली होती. खोकला किंवा अन्य लक्षणे दिसतात तर मातृसेवा संघात तेथेच त्याची तात्काळ तपासणी करण्याची यंत्रणा ठेवणे अशा काळात गरजेचे आहे. मात्र, त्याउलट रुग्णांना नाकारणे, हा प्रसुती वेदना असलेल्या महिलेवर अन्याय असल्याची भावना सपना यांचे पती प्रशांत दशमवार यांनी व्यक्त केली.
मेयो, मेडिकल, डागा रुग्णालयावर येईल प्रचंड भार
कोरानाचे संकट अत्यंत भयावह आहे. लॉकडाऊन, संचारबंदी आणि नाकाबंदीमुळे व्यक्ती कुठेच जाऊ शकत नाही. अनेक गर्भवती महिला बाळंतपणासाठी आपल्या माहेरी जाण्याची तयारी करत असतानाच हे संकट उद्भवले आहे. त्यामुळे, नागपुरातच प्रसुती करण्याची वेळ आली आहे. खाजगी रुग्णालये यावेळी प्रसुतीची प्रकरणे हाताळण्यास टाळाटाळ करत आहेत. अशावेळी त्यांना सुतिकागृहे, मेडिकल, मेयो व डागा या रुग्णालयांचेच पर्याय उपलब्ध आहेत. मात्र, प्रसुतीच्या क्षेत्रात अतिशय प्रतिष्ठित असलेल्या सुतिकागृहांसारख्या रुग्णालयांनी आपल्या कर्तव्याकडे पाठ फिरविल्यावर मेडिकल, मेयो या रुग्णालयांवर अधिक ताण पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.