गर्भवतींनो हिरड्यांचे आजार सांभाळा, कमी वजनाचे बाळ जन्माची शक्यता: डॉ तुषार श्रीराव
By सुमेध वाघमार | Published: February 23, 2024 08:18 PM2024-02-23T20:18:14+5:302024-02-23T20:19:13+5:30
शासकीय दंत महाविद्यालयात राष्ट्रीय पेरियोडॉन्टिस्ट दिन.
सुमेध वाघमारे, नागपूर : किशोरवयीन मुली आणि गर्भवतींमधील दातांचा आजारांकडे दुर्लक्ष करू नये. लक्षणे दिसताच उपचार घ्या. जर गर्भवतींना हिरड्यांचे आजार असतील तर त्यांच्या पोटी कमी वजनाचे बाळ जन्माला येते, असे एका अभ्यासातून पुढे आले आहे, अशी माहिती इंडियन सोसायटी आॅफ पेरियोडॉन्टोलॉजी मुख्यालयाचे उपाध्यक्ष डॉ. तुषार श्रीराव यांनी येथे दिली.
शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाचा पेरियोडॉन्टोलॉजी विभागातर्फे शुक्रवारी राष्ट्रीय पेरियोडॉन्टिस्ट दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून वरिष्ठ पेरियोडॉन्टिस्ट डॉ. आर. एम. कोहाड, डॉ. आर. के. येल्टीवार यांच्यासह कार्यकारी अधिष्ठाता डॉ. मंगेश फडनाईक उपिस्थत होते.
किशोरवयीन मुली आणि गर्भवती महिलांच्या मुख आरोग्याची तपासणी व उपचार करणे ही अलिकडच्या काळाची गरज असल्याचे आवाहनही डॉ. श्रीराव यांनी केले. या दिनाच्यानिमित्ताने सेल्फी विथ स्माईल स्पर्धा, स्लोगन स्पर्धा, रील मेकिंग स्पर्धा, मोबाईल छायाचित्रण स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा आणि पेशंट टेस्टोमोनियल स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती डॉ. फडनाईक यांनी दिली.
यावेळी पदवीपूर्व विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. डॉ. कल्पक पीटर हे क्विझमास्टर होते. डॉ मानसी जोशी यांनी प्रश्नमंजुषा स्पर्धेचे संचालन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. वैभव कारेमोरे, डॉ.विवेक ठोंबरे यांनी परिश्रम घेतले. संचालन डॉ. पायल व डॉ. दीपक यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. श्रीया, अपूर्वा, विवेक, आयुषी, सेजल, याकांग, हरिलाल यांनी परिश्रम घेतले. आभार डॉ.विवेक ठोंबरे यांनी मानले.