पूर्वाचा मृत्यू संशयास्पद

By admin | Published: September 12, 2015 02:35 AM2015-09-12T02:35:16+5:302015-09-12T02:35:16+5:30

तोंडाखैरीतील बीटीपी फार्म हाऊसमध्ये पूर्वा संजय हेडाऊ (वय १८, रा. हुडकेश्वर रोड, पिपळा फाटा, नागपूर) या विद्यार्थिनीच्या संशयास्पद ...

Preliminary death suspect | पूर्वाचा मृत्यू संशयास्पद

पूर्वाचा मृत्यू संशयास्पद

Next

नागपूर : तोंडाखैरीतील बीटीपी फार्म हाऊसमध्ये पूर्वा संजय हेडाऊ (वय १८, रा. हुडकेश्वर रोड, पिपळा फाटा, नागपूर) या विद्यार्थिनीच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणाचे रहस्य उलगडण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. मात्र, या फार्म हाऊसमध्ये तीन दिवसांपूर्वीसुद्धा अशाच प्रकारे एका तरुणाचा मृत्यू झाला आणि कळमेश्वर पोलिसांकडे निनावी व्यक्तीने माहिती देऊनही त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे कळमेश्वर पोलिसांची भूमिका संशयास्पद ठरली आहे. या फार्म हाऊसमध्ये मोठे गैरप्रकार घडत असल्याच्या नागरिकांकडून वारंवार तक्रारी होऊनही पोलीस त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत होते, अशीही धक्कादायक माहिती चर्चेला आली आहे.
६ मैत्रिणी आणि २१ मित्रांसह पूर्वा हेडावू तोंडाखैरी शिवारातील बीपीटी हाऊसमध्ये गुरुवारी दुपारी बर्थ डे पार्टीसाठी गेली होती. या २८ विद्यार्थ्यांपैकी अनेक जण मोठ्या प्रमाणात दारू पिले. सिगारेटही ओढल्या. मोठ्या प्रमाणात मद्यप्राशन झाल्यामुळे अनेक जण बाजूच्या खोल्यांमध्ये गेले. सायंकाळी ६ च्या सुमारास काहींची नशा उतरली. अंधार पडत असल्यामुळे परत निघण्याची त्यांनी तयारी केली. त्यावेळी पूर्वा दिसत नसल्याने तिची शोधाशोध सुरू झाली. बराच वेळ शोधाशोध केल्यानंतर पूर्वाचा मृतदेह स्विमिंग पूलमध्ये आढळला. त्यानंतर येथे एकच गोंधळ उडाला. पूर्वा बेशुद्ध असून तिला नागपुरात उपचारासाठी घेऊन जाण्याचा सल्ला देण्यात आला. या प्रकरणात फार्म हाऊस किंवा मालकाचे आणि ‘त्या‘ आंटीचे नाव येऊ नये, यासाठी बरीच खबरदारी घेतली गेली. मात्र, विद्यार्थ्यांचा गोंधळ वाढल्याने शेवटी कळमेश्वर पोलिसांना कळविण्यात आले आणि पोलीस घटनास्थळी पोहचले.
पोलीसच आरोपीच्या पिंजऱ्यात
नागपूर : पूर्वाच्या संशयास्पद मृत्यूच्या निमित्ताने फार्म हाऊसमधील गैरप्रकारासोबतच कळमेश्वर पोलिसांचीही वादग्रस्त भूमिका उजेडात आली आहे. आजूबाजूच्या गावातील नागरिकांच्या माहितीनुसार, या फार्म हाऊसमध्ये नेहमीच धांगडधिंगा चालायचा. रात्री उशिरापर्यंत डीजेचा कर्णकर्कश आवाज यायचा. नागरिक त्याच्या तक्रारीही पोलिसांकडे करायचे. मात्र कळमेश्वरचे पोलीस त्याकडे दुर्लक्ष करायचे.तीन दिवसांपूर्वी मनोज कारघाटे या तरुणाचा अशाच प्रकारे संशयास्पद मृत्यू झाला. कळमेश्वर पोलिसांनी त्याकडेही लक्ष दिले नाही. याशिवायही जुगार आणि बुकी बाबत वारंवार माहिती देऊनही पोलीस कारवाई करीत नसल्याची चर्चा या भागात आहे. त्यामुळे या गैरप्रकारात कळमेश्वर पोलिसांचाही सहभाग असल्याचा संशय बळावला आहे.
वैद्यकीय तपासणीत अनेक टुन्न
या ओल्या पार्टीत सहभागी झालेले विद्यार्थी १६ ते २२ वर्षे वयोगटातील आहे. त्यातील बहुतेकांनी मद्यपान व धुम्रपान केल्याचे वैद्यकीय तपासणीतून स्पष्ट झाले. काही जण तर प्रमाणापेक्षा जास्त मद्यपान करून होते. कळमेश्वर पोलिसांनी त्यांची कशी चौकशी केली ते कळायला मार्ग नाही. मात्र, पूर्वा कशी आणि कधी पाण्यात बुडाली, ते कुणीही सांगितले नसल्याचे कळमेश्वर पोलीस सांगत आहेत.
पोलीस निरीक्षकांची लपवाछपवी
आतापर्यंतच्या गैरप्रकाराला झाकणारे कळमेश्वर पोलीस आजही या गंभीर प्रकरणातील वास्तव लपविण्यासाठी आटापिटा करीत असल्याचे जाणवले. पोलीस निरीक्षक प्रमोद मडामे यांच्याकडे लोकमत प्रतिनिधीने या प्रकरणाच्या तपासात काय निष्पन्न झाले, ज्याच्यावर गुन्हा दाखल झाला त्याचे नाव जाणून घेण्यासाठी संपर्क केला असता अद्याप कुणावरही गुन्हा दाखल झाला नसल्याचे त्यांनी शुक्रवारी रात्री ९.३० वाजता सांगितले. विशेष म्हणजे, पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी या प्रकरणात लॉन मालक सिराज शेख विरुद्ध गुन्हा दाखल केल्याचे सांगितले होते.

Web Title: Preliminary death suspect

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.