प्रेमानंद गज्वी ; खेड्यातला नाट्यरसिक ते नाट्य संमेलनाध्यक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 11:58 PM2018-11-23T23:58:36+5:302018-11-24T00:01:22+5:30
चंद्रपूरच्या पिंपळगाव या खेड्यातील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या या मुलाला बालपणापासूनच नाटकांची प्रचंड आवड होती. कोणत्याही गावी होणारे नाटक पाहण्यासाठी कोस-दोन कोस पायी चालणारा हा मुलगा पुढे महाराष्ट्राच्या सर्वोच्च नाट्य सोहळ्याच्या अध्यक्ष पदावर निवडला जाईल, याची कल्पनाही कुणी केली नसेल. पण अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्ष पदी निवड झालेल्या प्रेमानंद गज्वी यांचा हा थक्क करणारा प्रवास वैदर्भीय नाट्य व कलारसिकांना आनंद देणारा आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : चंद्रपूरच्या पिंपळगाव या खेड्यातील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या या मुलाला बालपणापासूनच नाटकांची प्रचंड आवड होती. कोणत्याही गावी होणारे नाटक पाहण्यासाठी कोस-दोन कोस पायी चालणारा हा मुलगा पुढे महाराष्ट्राच्या सर्वोच्च नाट्य सोहळ्याच्या अध्यक्ष पदावर निवडला जाईल, याची कल्पनाही कुणी केली नसेल. पण अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्ष पदी निवड झालेल्या प्रेमानंद गज्वी यांचा हा थक्क करणारा प्रवास वैदर्भीय नाट्य व कलारसिकांना आनंद देणारा आहे.
ज्येष्ठ नाटककार म्हणून महाराष्ट्रातील साहित्य विश्वात त्यांचे नाव आज आदराने घेतले जाते. गावातच प्राथमिक शिक्षण व पुढे नागपूरला महाविद्यालयीन शिक्षणाचा प्रवास केल्यानंतर मुंबईला त्यांनी नोकरी स्वीकारली. तसे लहानपणापासूनच कथा व कविता लेखनाचा प्रवास सुरू झाला होता. मात्र नोकरीत असताना स्पर्धेला नाटक पाठवायचे, या आग्रहाने ‘घोटभर पाणी’ या एकांकिकेचे लेखन केल्यानंतर हा नाट्यप्रवास खऱ्या अर्थाने सुरू झाला. शहरात राहूनही त्यांचे गाव कायम त्यांच्या मनात शिरलेलं. म्हणूनच ६०-६५ वर्षापूर्वीचं त्यांच गाव आधुनिक काळात पुरते बदलल्याची, कधी शुद्ध हवा देणाऱ्या गावातही प्रदुषण पसरल्याची खंत त्यांच्या मनात येते. या गावाचे प्रतिबिंब त्यांच्या नाटकातही झळकत राहिले.
वेठबिगारांच्या जीवनातला संघर्ष मांडणाऱ्या‘तन माजोरी’ या नाटकाचा पहिलाच प्रयोग लंडनला झाला. त्याचे दिग्दर्शन ज्येष्ठ नाट्य व चित्रपट अभिनेता विक्रम गोखले यांनी केले. पुढे व्यवसायिक रंगभूमीवर झालेल्या प्रयोगात अभिनेता नाना पाटेकर यांनी अभिनय केला. स्मशानकर्मे पार पाडणाऱ्या ब्राम्हण वर्गाच्या जीवनाचा वेध घेणारे ‘किरवंत’ हे नाटक असेच लोकप्रिय ठरले. ज्येष्ठ अभिनेता डॉ. श्रीराम लागू यांनी व्यवसायिक रंगभूमीवर या नाटकाच्या प्रयोगाचे दिग्दर्शन व अभिनयही केला. त्यांच्या ‘देवनगरी, वांझमाती, जय जय रघुवीर समर्थ, पांढरा बुधवार, गांधी - आंबेडकर, रंगयात्री, शुद्ध बिजापोटी, अभिजात जंतू, दि बुद्धा, छावणी’ या नाटकांनाही अनेक पुरस्कार प्राप्त झाले. या नाटकांचे इंग्रजीसह इतर भाषांमध्ये अनुवादही झाले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या जीवन गौरव पुरस्कारासह २५ पेक्षा जास्त पुरस्कार विविध साहित्यकृतीसाठी त्यांना प्राप्त झाले आहेत. लहानपणापासून जगलेले जीवन हीच आपली भूमिका असल्याचे सांगताना गेल्या ४५ वर्षापासून रंगभूमीची सेवा केल्यानंतर मिळालेला हा सन्मान आनंद देणारा आहे, अशी भावना त्यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.