मेट्रो रेल्वेसाठी जागेचा तिढा सुटला
By Admin | Published: September 1, 2015 03:24 AM2015-09-01T03:24:31+5:302015-09-01T03:24:31+5:30
मेट्रो रेल्वे बांधणीसाठी नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनला लिमिटेडला (एनएमआरसीएल) हव्या असलेल्या जागेचा तिढा
नागपूर : मेट्रो रेल्वे बांधणीसाठी नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनला लिमिटेडला (एनएमआरसीएल) हव्या असलेल्या जागेचा तिढा आता जवळपास संपुष्टात आला आहे. हिंगणा येथे शेडसाठी एसआरपीएफच्या फायरिंग रेंजची जागा कंपनीच्या ताब्यात आली आहे.
८० टक्के जागा ताब्यात
४कमीत कमी जागेचे अधिग्रहण व्हावे म्हणून मेट्रो रेल्वेचे डिझाईनमध्ये वारंवार बदल करण्यात आल्यामुळे आता कंपनीला ८५ ते ८७ हेक्टर जागेची गरज भासणार आहे. त्यापैकी ८० टक्के जागा कंपनीच्या ताब्यात आली आहे. पूर्व-पश्चिम आणि उत्तर-दक्षिण मार्गावर अंतिम टप्प्यात मेट्रो रेल्वेची देखभाल, दुरुस्ती आणि स्टेशनसाठी बांधण्यात येणाऱ्या शेडसाठी खापरी येथील जवळपास ३७ हेक्टर जागा महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने दोन महिन्यापूर्वीच ‘एनएमआरसीएल’ला हस्तांतरित केली आहे आणि त्या मार्गावर बांधकामही सुरू झाले आहे. याशिवाय हिंगणा येथील एसआरपीएफच्या फायरिंग रेंजची २६ हेक्टर जागा काहीच दिवसांपूर्वी कंपनीकडे हस्तांतरित झाली आहे. त्या मार्गावर बांधकामाच्या निविदा लवकरच काढण्यात येणार असल्याची माहिती आहे. याशिवाय मेट्रो रेल्वेच्या मार्गातील पटवर्धन शाळा, मॉरिस कॉलेज आणि शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या जागेवर शिक्कामोर्तब झाले आहे.
तांत्रिक अडचणीचे कारण
४बांधकामाच्या कालबद्ध नियोजनासाठी जनरल कन्सल्टंटच्या नियुक्तीची निविदा एक महिन्यापूर्वीच आॅनलाईन काढली आहे. निविदा भरण्याची अंतिम तारीख २६ आॅगस्ट होती. पण तांत्रिक त्रुटीमुळे निविदा उघडण्याची तारीख दोन आठवड्याने वाढविली आहे. याशिवाय मुंजे चौक ते खापरी मार्गावर जवळपास ७ कि़मी. अंतरावर रेल्वे मार्ग आणि अन्य बांधकामासाठी काढलेल्या आॅनलाईन निविदेची अंतिम तारीख २८ आॅगस्ट होती. पण तांत्रिक अडचणीचे कारण पुढे करून निविदा दोन आठवड्यानंतर उघडण्यात येणार आहे. या दोन्ही निविदा १५ सप्टेंबरपर्यंत उघडणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
कार्ड तिकीट मोबिलिटीसाठी निविदा
४कार्ड तिकिट मोबिलिटीसाठी कंपनीने आॅनलाईन निविदा काढल्या आहेत. सर्व्हिस प्रोव्हायडर कोण राहील, त्याचे मूल्यांकन आणि अन्य सेवेसाठी ही निविदा आहे. याशिवाय मुंजे चौकात आॅयकॉनिक टॉवर उभारणीसाठी कंपनीने देशविदेशातील नामांकित आणि अशा प्रकारचे डिझाईन यापूर्वी तयार केलेल्या आर्टिटेक्ट कंपन्यांसाठी ‘एनएमआरसीएल’ने स्पर्धा बोलविली होती. त्यातील १२ ते १३ जणांनी निवड करून त्यांच्याद्वारे चौकाचे डिझाईन तयार करण्यात येणार आहे.