युद्धाची तयारी व नकार एकाच नाण्याच्या दोन बाजू : लक्ष्मणराव जोशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2019 12:27 AM2019-03-06T00:27:35+5:302019-03-06T00:29:09+5:30
एकीकडे सरकारतर्फे सैन्यदल व शस्त्र खरेदीसाठी पैसा गुंतविला जातो तर दुसरीकडे जनसामान्यांकडून युद्धाला विरोध केला जातो. यावरून देश युद्धाचे समर्थन करतो की नाही, असा विरोधाभास निर्माण होतो. मात्र सैन्यदल सक्षम करणे आणि युद्धाला विरोध करणे या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, असे मत ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मणराव जोशी यांनी व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एकीकडे सरकारतर्फे सैन्यदल व शस्त्र खरेदीसाठी पैसा गुंतविला जातो तर दुसरीकडे जनसामान्यांकडून युद्धाला विरोध केला जातो. यावरून देश युद्धाचे समर्थन करतो की नाही, असा विरोधाभास निर्माण होतो. मात्र सैन्यदल सक्षम करणे आणि युद्धाला विरोध करणे या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, असे मत ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मणराव जोशी यांनी व्यक्त केले.
माजी वायुसैनिक कल्याण संस्था (ईव्वान)च्यावतीने आयोजित सामाजिक जागृती अभियान बीआरए मुंडले सभागृह येथे आयोजित करण्यात आले. ‘काश्मीरचा मुद्दा आणि पत्रकारिता’ या विषयावर त्यांनी आपले विचार मांडले. ते पुढे म्हणाले, कोणताही देश युद्ध नको असे आश्वस्त करीत असला तरी कोण कधी हल्ला करेल, हे सांगता येत नाही. अशावेळी आपले सशस्त्र दल तयारीत असले की समोरच्या देशाला हल्ला करताना मागे-पुढे पाहावे लागेल. त्यांच्यातील ही भीती युद्ध टाळण्यास कारणीभूत ठरते. म्हणजे युद्धाची तयारी करणे हे युद्ध टाळण्याचेच पाऊल होय, असे विश्लेषण त्यांनी मांडले. काश्मीर समस्या कशी निर्माण झाली व दोन्ही देशांचा काय दृष्टिकोन आहे, यावर त्यांनी प्रकाश टाकला. भारताच्या दृष्टिकोनातून काश्मीरमधील एकतृतीयांश भागावर पाकिस्तानने कब्जा केला आहे. दुसरीकडे देशाची फाळणी धर्माच्या आधारावर झाल्याने याच आधारावर काश्मीर ताब्यात द्यावे, असा पाकिस्तानचा अट्टाहास आहे. ही समस्या एक तर चर्चेने किंवा युद्धाने सोडविली जाऊ शकते. मात्र भारताच्या सैन्यासमोर टिकणे व युद्धाने काश्मीर मिळविणे शक्य नाही, याची जाणीव पाकिस्तानला आहे. त्यामुळे ते दहशतवादाचा वापर करतात. मात्र काश्मीर आणि पाकिस्तानचेही बहुसंख्य मुस्लिम निष्पाप असून ते युद्धाचा विचारही करीत नसल्याचे जोशी म्हणाले. कोणत्याही शर्ती न स्वीकारता विंग कमांडर अभिनंदन यांना परत आणणे, ही बाब समस्या सोडविण्याची नवी सुरुवात ठरू शकते, असे मत त्यांनी मांडले.
यावेळी प्रा. दिलीप डबीर यांनी ‘काश्मीर मुद्दा आणि तरुण’ या विषयावर, सुमंत टेकाडे यांनी ‘शिवाजी महाराज आणि युद्धाचे डावपेच’ या विषयावर आपले विचार मांडले. मेजर जनरल अनिल बाम यांनी ‘सैन्यदलाचे युद्धासाठी डावपेच’ या विषयावर आपली भूमिका मांडली. पुंडलिक सावंत, मनोहर भातकुलकर, महेश आंबोकर, चंद्रशेखर कुळकर्णी, लक्ष्मीकांत नांदूरकर, श्रीकांत गंगाधडे आदी उपस्थित होते.