नागद्वार यात्रेसाठी लालपरीची तयारी
By नरेश डोंगरे | Published: July 19, 2024 06:44 PM2024-07-19T18:44:52+5:302024-07-19T18:45:57+5:30
१ ऑगस्टपासून १० ऑगस्टपर्यंत सेवा : ४८ गाड्यांमधून भाविकांना घडविली जाणार यात्रा
नरेश डोंगरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या नागद्वार यात्रेसाठी लालपरीने तयारी केली आहे. भाविकांना सेवा देण्यासाठी एसटी महामंडळाच्या नागपूर विभागाकडून आतापासूनच नियोजन करण्यात आले असून त्यासंबंधाने वेगवेगळ्या आगार प्रमूख, विभाग नियंत्रकांना तयारीचे निर्देश देण्यात आले आहे.
विविध प्रांतातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेली नागद्वार यात्रा ऑगस्ट महिन्यात येते. मध्य प्रदेशातील पचमढी येथे ही यात्रा भरते आणि त्यासाठी महाराष्ट्र, छत्तीसगड तसेच मध्य प्रदेशासह विविध प्रांतातील लाखो भाविक यात्रेत सहभागी होतात. नागपूर-विदर्भातीलही हजारो भाविक त्यांच्या सोयीनुसार नागद्वार यात्रेला वेगवेगळ्या वाहनाने जातात. एसटी बसने जाणाऱ्या भाविकांची संख्या प्रचंड असते. ते ध्यानात घेऊन भाविकांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाच्या नागपूर विभागाने आतापासूनच तयारी चालविली आहे. त्यासाठी कोणत्या आगारातून किती बसेस सोडायच्या, त्यांचे वेळापत्रक कसे राहिल, त्याचा आढावा घेऊन नागपूर ते नागद्वार आणि नागद्वार ते नागपूर अशा २४ जाणाऱ्या आणि २४ येणाऱ्या (एकूण ४८) गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, नागद्वार मध्य प्रदेशात येते. अर्थात महाराष्ट्रातून तिकडे प्रवासी बस पाठवायच्या असेल तर त्यासाठी जाण्या-येण्याचा दोन्ही कडचा परवाना काढावा लागतो. त्यासाठी विशिष्ट करदेखिल भरावा लागतो. त्यामुळे तात्पुरते परवाने काढून घेण्याची ही प्रक्रिया आधीच पूर्ण करून घेण्याचे निर्देश संबंधित आगार प्रमूखांना वरिष्ठांकडून देण्यात आले आहे.
७५० रुपयांत जाण्या-येण्याचा प्रवास
नागपूरहून नागद्वार यात्रेसाठी जाणाऱ्या प्रवाशाला केवळ ३७५ रुपये तिकिट भाडे आकारले जाणार आहे. अर्थात यात्रेला जाण्या-येण्याचा प्रवास केवळ ७५० रुपयांत होणार आहे. गर्दीमुळे वेळेवर निराशा होऊ नये म्हणून प्रवासी आधीच आरक्षण (रिझर्वेशन) करू शकतात. त्यासाठी संबंधित प्रवाशांना पाच रुपये रिझर्वेशन फी द्यावी लागणार आहे.
चार आगार, ४८ बसेस
१ ऑगस्ट पासून नागद्वार यात्रेला जाणाऱ्या भाविकांसाठी लालपरीची सेवा सुरू होणार असून, ती १० ऑगस्टपर्यंत राहणार आहे. त्यासाठी गणेशपेठ आगारातून १६ बसेस, घाटरोड आगारातून १६ बसेस, ईमामवाडा आगारातून १० तर वर्धमान नगर आगारातून ६ अशा एकूण ४८ बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. दर अर्ध्या तासानंतर भाविकांसाठी बस उपलब्ध राहणार आहे.
नागपूर आणि पचमढीत व्यवस्था
यात्रा व्यवस्था आणि बस वाहतुकीचे नियंत्रण करण्यासाठी दोन ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. नागपूरच्या गणेशपेठ मध्यवर्ती बसस्थानकावरून बसेस सुटेल. त्याचप्रमाणे नागपूर-विदर्भात परतीचा प्रवास करणाऱ्या भाविकांना पचमढी बसस्थानकावर व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती एसटीच्या नागपूर विभागाचे उपमहाव्यवस्थापक श्रीकांत गभणे यांनी लोकमतला दिली आहे.