बापरे! ही तर तिसऱ्या लाटेची तयारी; बाजारातील अनियंत्रित गर्दीमुळे चिंता वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 11:10 AM2021-06-09T11:10:33+5:302021-06-09T11:12:10+5:30
Nagpur News कोविड संक्रमण नियंत्रणात आल्याने नागपूर शहरातील दुकाने सुरू ठेवण्याचा कालावधी वाढविण्यात आला आहे. सोबतच निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत; परंतु बाजारात प्रचंड गर्दी होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोविड संक्रमण नियंत्रणात आल्याने नागपूर शहरातील दुकाने सुरू ठेवण्याचा कालावधी वाढविण्यात आला आहे. सोबतच निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत; परंतु बाजारात प्रचंड गर्दी होती. या गर्दीमुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. त्यात काही दुकानदारांनी सायंकाळी पाचपर्यंत वेळ असताना उशिरापर्यंत दुकाने सुरू ठेवली. याचा विचार करता उपद्रव शोध पथकाला (एनडीएस) शहरातील प्रमुख बाजार असलेल्या सीताबर्डी, महाल, इतवारी, खामला, जरीपटका, सक्करदरा आदी भागांतील गर्दी नियंत्रित करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर नियमानुसार आर्थिक दंड आकारण्याचे आदेश देण्यात आले आहे.
सीताबर्डी, महाल, इतवारी बाजारात मंगळवारीही गर्दी दिसून आली. दुकानांतील गर्दीसोबत कोविड नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले. नियमांचे कठोर पालन झाले नाही, तर पुन्हा संक्रमण वाढण्याचा धोका आहे. याचा विचार करता मनपा प्रशासन सतर्क झाले आहे. दुकाने, हॉटेल, रेस्टाॅरंट आदींना नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे, अन्यथा कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिला आहे.
... तर निर्बंध लावले जातील
अनलॉकनंतर पहिल्याच दिवशी बाजारात मोठी गर्दी होती. याचा विचार करता कोविड संक्रमण फार काळ नियंत्रणात राहणार नाही, असा धोका असल्याने दर शुक्रवारी अनलॉकचा आढावा घेतला जाणार आहे. ज्या भागात नियमांचे पालन होणार नाही. अशा परिसरात निर्बंध लावावे लागतील, असा इशारा मनपा प्रशासनाने दिला आहे.
आठवडाभर ठेवणार नजर
सुरुवातीला काही दिवस बाजारातील गर्दी, दुकानदारांकडून नियमांचे पालन होते की नाही, यावर प्रशासनाची नजर राहणार आहे. नियमांचे उल्लंघन होत असल्यास निर्बंध लावण्याची तयारी करावी लागेल. यामुळे सर्वांना नियमांचे पालन करावेच लागेल, असा इशारा मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिला आहे.
सुपर स्प्रेडर्सची चाचणी आवश्यक
दुकानातील कर्मचारी, ठेलेवाले, रेस्टाॅरंट व हॉटेलमधील कर्मचारी, हॉकर्स, भाजीपाला विक्रेते आदींना कोरोना चाचणी करणे आवश्यक आहे. सोबतच मास्कचा वापर, सोशल डिस्टन्स अशा नियमांचे पालन करावे लागेल.