हिवाळी अधिवेशन तयारी; शुक्रवारपासून सचिवालय नागपुरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2019 10:48 AM2019-12-05T10:48:37+5:302019-12-05T10:49:00+5:30
येत्या १६ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. कमी दिवस असल्यामुळे सध्या दिवसरात्र काम सुरू आहे. नागभवन व रविभवन येथील मंत्र्यांचे बंगले सज्ज आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : येत्या १६ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. कमी दिवस असल्यामुळे सध्या दिवसरात्र काम सुरू आहे. नागभवन व रविभवन येथील मंत्र्यांचे बंगले सज्ज आहेत. बंगल्यावर नाव लिहिण्यासाठी पाट्याही तयार आहेत, परंतु या पाट्यांवर नाव कुणाचे लिहावे, असा प्रश्न आहे. त्यामुळे या पाट्यांना खातेवाटपासह, मंत्रिमंडळ विस्ताराची प्रतीक्षा आहे. कारण खातेवाटप होताच मंत्र्यांना बंगल्याचे वाटप होणार आहे. दरम्यान, ६ डिसेंबरपासून सचिवालय नागपुरात दाखल होणार असून कामकाजास सुरुवात करणार आहे.
मुख्यमंत्र्यांसाठी शासकीय निवासस्थान रामगिरी आहे तर उपमुख्यमंत्री किंवा दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री यांच्यासाठी देवगिरी हा बंगला राखीव असतो. मागच्या भाजप सेनेच्या काळात उपमुख्यमंत्री पद रिकामे होते. उपमुख्यमंत्र्यांचे निवासस्थान अशीच देवगिरी बंगल्यांची ओळख आहे. आता शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या महाविकास आघाडीच्या सरकारमध्येही सध्या खातेवाटप झालेले नाही. त्यामुळे हा बंगला कुणाच्या वाट्याला येतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसे देवगिरी आपल्याला मिळावा, यासाठी मंत्र्यांकडून जोर लावला जात असल्याचीही माहिती आहे. ज्येष्ठतेनुसारच देवगिरी बंगल्याचे वाटप केले जाते.
नागपूर हिवाळी अधिवेशन १६ डिसेंबरपासून सुरू होत आहे. अधिवेशनाची पूर्वतयारी म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाने रंगरंगोटी आणि डागडुजीचे सुरू केलेले काम अंतिम टप्प्यात आहे. रविभवन येथे कॅबिनेट मंत्र्यांचे ३० बंगले आहेत.
विधिमंडळातील अधिकारी आज दाखल होणार
हिवाळी अधिवेशनासाठी मुंबई विधिमंडळातील अधिकारी हे गुरुवारला दाखल होणार आहेत. कॉम्प्युटर सेटिंग आणि पत्रकारांच्या पासेस बनवण्यासाठी काही कर्मचारी हे बुधवारी नागपुरात दाखल झालेले आहेत. काही अधिकारी उद्या येतील. यात वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही समावेश असल्याचे सांगितले जाते.
विभागीय आयुक्त घेणार आज आढावा
नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या तयारीसंदर्भात विभागीय आयुक्त डॉ. संजीवकुमार हे उद्या विभागीय आयुक्त कार्यालयात आढावा घेतील. या बैठकीत जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित राहतील.